मोटारचालकांकडून एस.टी. बसचालकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:27+5:302021-02-23T04:36:27+5:30
कोल्हापूर : संभाजीनगरमधील इंदिरासागर चौकात मोटारचालकाने एस.टी. बसचालकास बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या ...

मोटारचालकांकडून एस.टी. बसचालकास मारहाण
कोल्हापूर : संभाजीनगरमधील इंदिरासागर चौकात मोटारचालकाने एस.टी. बसचालकास बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे सुमारे पाऊणतास वाहतूक खोळंबली. याप्रकरणी बसचालकाच्या तक्रारीनुसार अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नंदगाव ते शाहू मैदान, अशी एस.टी. बस धावत होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास इंदिरासागर चौकात पेट्रोल पंपानजीक एक मोटार चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आली, ती पाठीमागून येऊन एस.टी. बसच्या आडवी उभी केली. त्या मोटारीतून चालक खाली उतरून त्याने एस.टी. बसमधील चालक संजय राजाराम मगदूम (वय ४८, रा. नागाव, ता. हातकणंगले) याला बसमधून शर्टला धरून केबिनमधून बाहेर ओढले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. सिग्नल चौकानजीक हा प्रकार घडल्याने परिसरात गोंधळ उडाला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मोटारचालकाने परिस्थिती पाहून मोटारीसह पलायन केले. याबाबत जखमी संजय मगदूम या बसचालकाने जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी मोटारचालकांवर गुन्हा नोंदवला आहे.