एस.टी.प्रमाणे के.एम.टी.लाही बुस्टरची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:43+5:302020-12-05T04:52:43+5:30
कोल्हापूर : एस. टी. प्रमाणे के.एम.टी.चीही अर्थिक स्थिती बेताची आहे. येथील कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून २५ टक्के पगार कपात ...

एस.टी.प्रमाणे के.एम.टी.लाही बुस्टरची गरज
कोल्हापूर : एस. टी. प्रमाणे के.एम.टी.चीही अर्थिक स्थिती बेताची आहे. येथील कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून २५ टक्के पगार कपात सुरू आहे. ज्याप्रमाणे एस.टी.ला एक हजार कोटींचे सहाय देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणेच तोट्यात असणाऱ्या के.एम.टी.लाही राज्य सरकारकडून बुस्टरची गरज आहे. एस.टी.ला १ हजार कोटी दिले, के.एम.टी.ला किमान १० कोटी तरी द्या, अशी मागणी जोर धरत आहे.
कोरोनामुळे राज्याची तिजोरीवर परिणाम झाला असतानाही एस.टी.ला १ हजार कोटींची अर्थसहायक मंजूर केले. एस.टी.प्रमाणे राज्यातील ११ महापालिका सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा देत आहेत. त्यांनाही काेरोनाचा फटका बसला आहे. त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या के.एम.टी.चाही समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये बससेवा बंद राहिली. सध्या सेवा सुरू असली तरी अपेक्षित प्रवासी नाहीत. ७० बसेस वर्कशॉपमध्ये लावून आहेत. के.एम.टी.चा सध्या रोज १० लाखांचा तोटा होत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
चौकट
नेत्यांनी जोर लावल्यास शक्य
शासनाच्या अंतर्गत एस. टी. महामंडळ असल्यामुळे या खात्याला अर्थसाहाय्य देणे क्रमप्राप्त आहे. परंतु के.एम.टी.लाही ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर सेवा देत आहे. विशेष म्हणजे महापालिकेवर गेले १० वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. विशेष म्हणजे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे परिवहन खाते आहे. त्यांनी जोर लावला तर के.एम.टी.ला विशेष बाब म्हणून अर्थसाहाय्य मिळणे कठीण नाही.
चौक़ट
हक्काचे साडेतीन कोटी तरी द्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सेवेत २५ के.एम.टी. बस होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मोबदल्यात के.एम.टी.ला ४ कोटींचे देणे बाकी आहे. वारंवार मागणी केल्यानंतर केवळ ५० लाख दिले. हक्काचे साडेतीन कोटी तरी प्रशासनाने के.एम.टी.ला द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
के.एम.टी.चा रोजचा तोटा : १० लाख
रोजचे उत्पन्न : २ लाख
एकूण कर्मचारी : ६७०
महिन्याला कर्मचारी पगारावर खर्च : १ कोटी ६५ लाख
२५ टक्के कपातीमुळे थकीत पगार : १ कोटी ७० लाख