एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:34+5:302021-09-14T04:29:34+5:30
कोल्हापूर : कोराेना संसर्गानंतर कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रवासाचा आधार असलेले एस.टी. महामंडळ अर्थिक अडचणीत आले. त्यामुळे गेले दीड वर्षात वेळेवर ...

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात
कोल्हापूर : कोराेना संसर्गानंतर कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रवासाचा आधार असलेले एस.टी. महामंडळ अर्थिक अडचणीत आले. त्यामुळे गेले दीड वर्षात वेळेवर पगार तर नाहीच. याशिवाय वैद्यकीय बिलेही थकली आहेत. त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांना दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न पडला आहे.
एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील वाहक, चालक, अधिकार, इतर कर्मचारी असे एकूण ४८४५ इतके आहेत. यातील अनेक कर्मचाऱ्यांची सुमारे एक कोटींहून अधिक रुपयांची बिले थकली आहेत. त्यात पगारही वेळेवर होईनासा झाला आहे. त्यामुळे वाहक, चालक, कर्मचारी, अधिकारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्मचारी संघटनाही महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण अथवा राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ महामंडळासाठी वेगळे बजेट राखून ठेवावे, अशी मागणी करू लागले आहेत. मुळात प्रवाशांच्या प्रवासाकरिता प्रतिसाद नाही. त्यामुळे महामंडळाला नऊ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. त्यातून पगारासाठी दर महिन्याला मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना साकडे घालावे लागत आहेत. वैद्यकीय बिलांकरिता विशेष निधीच उपलब्ध नसल्याने ही बिले प्रलंबित राहिली आहेत. कोल्हापूर विभागाला केवळ या बिलांकरिता सुमारे एक कोटींहून अधिक रक्कम हवी आहे.
जिल्ह्यातील एकूण आगार - १२
आगार संख्या - १२
कार्यशाळा - ०२
चालक - १४५०
वाहक - १४२५
अधिकारी - ४६
यांत्रिकी कर्मचारी व अन्य - १९२४
पगाराला उशीर
गेल्या दीड वर्षात अनेकदा दोन महिन्यानंतर पगार मिळू लागला आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील सुमारे ४८०० कर्मचारी अधिकाऱ्यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्याचा असा पगार अनुक्रमे एक व सात तारखेनंतर झाला.
वैद्यकीय बिले गेले दीड वर्षांपासून मिळेनात
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपासून एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील शस्त्रक्रिया व अन्य उपचारांची वैद्यकीय बिले अजूनही कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळालेली नाहीत. यासाठी संघटनांसह कर्मचारी लेखा शाखेकडे ती मिळावीत, अशी वारंवार मागणी करीत आहेत. मात्र, त्याकरिता निधीच उपलब्ध नसल्याने ती थकीत असल्याचे या विभागाकडून सांगितले जात आहे.
उपचारांवर झालेला खर्च कोठून आणायचा ?
महामंडळाच्या बिकट अर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांची मोठी व नियमित वैद्यकीय बिले प्रशासनाकडून प्रलंबित राहिली आहेत. याबाबत संघटनेकडून वारंवार मागणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर नाही. वैद्यकीय बिले मिळत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- संजीव चिकुर्डेकर, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस,कोल्हापूर
प्रतिक्रिया
गेल्या दीड वर्षांपासून अनेक कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले थकली आहेत. ती वेळेत मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. महामंडळाने पगारासोबतच या बिलाचाही विचार करावा.
- अप्पासाहेब साळोखे, इंटक, विभागीय सचिव
कोट महामंडळाकडून वैद्यकीय बिलापोटीचा निधी उपलब्ध झाल्यास तो कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा केली जाईल.
विलास चौगुले, विभागीय लेखाधिकारी, कोल्हापूर