शिये नाक्यावर एसआरपीएफची अरेरावी
By Admin | Updated: August 17, 2014 22:35 IST2014-08-17T22:18:20+5:302014-08-17T22:35:18+5:30
वाहनचालकांवर टोलसाठी दबाव : पोलीस अधीक्षकांचा आदेश धाब्यावर; वाहनधारकांतून तीव्र संताप

शिये नाक्यावर एसआरपीएफची अरेरावी
कोल्हापूर : ‘मंत्र्यांना फोन करा, नाहीतर एस.पी.ना सांगा, कोणत्याही परिस्थितीत टोल हा द्यावाच लागेल,’ अशा भाषेत कसबा बावडा-शिये टोलनाक्यावर राज्य राखीव दलाची (एसआरपीएफ) अरेरावी सुरू असल्याचा अनुभव काल, शनिवारी वाहनधारकांना आला. टोल वसुलीबाबत पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, असा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी दिलेला आदेश धाब्यावर बसवून राखीव दलाचे पोलीसच वाहनधारकांची गळचेपी करीत असल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
शिये टोलनाक्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहनधारकांना टोलसाठी वेठीस धरले जात आहे. कृती समितीच्या आवाहनामुळे टोल देणार नाही असे सांगणाऱ्या वाहनचालकांना नाक्यावरील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून दादागिरीचे तसेच अपमानास्पद बोलण्याचे प्रकार घडत आहेत. याला विरोध केल्यास पोलिसच दबाव टाकत असल्याचा प्रकार होत असल्याने या नाक्यावर सातत्याने तणावाची परिस्थती बनत आहे.
वास्तवीक नाक्यावरील कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नाक्याच्या मालमत्तेची जबाबदारी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची आहे, असे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. मात्र, राज्य राखीव दलाच्या ग्रुप क्र. १ (सेक्टर क्र. ३)च्या तुकडीने नाक्यावरील कर्मचाऱ्यांना टोलवसुलीसाठी मदत करण्याचा ठेकाच घेतल्याची परिस्थिती या नाक्यावर आहे. राखीव दलाचे सहायक पोलीस निरीक्षक व त्यांचे काही सहकारी टोल देण्यास नकार देणाऱ्या वाहनधारकांनाच दमदाटी करीत आहेत.
काल सायंकाळी सात वाजता एका वाहनधारकाने टोल देण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांशी वादावादी सुरू झाली. यावेळी राखीव दलाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी वाहनधारकास टोल का देत नाही असे असे दरडावत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका कर्मचाऱ्यास गाडी काढून घेण्याचे फर्मान सोडले. यानंतर वाहनचालकाने थेट जिल्हा पोलिस प्रमुख मनोजकुमार शर्मा यांना फोन लावला. यावेळक्ष शर्मा यांनी त्यांची कानउघाडणी केली.
इतका प्रकार घडूनही ोलीस कर्मचाऱ्यांनी ‘एस.पी.ला फोन कर, नाहीतर मंत्र्याला फोन कर. असे कितीतरी एस.पी. बघितले आहेत. पुन्हा येशील तेव्हा टोल नाही दिला तर गाठ आमच्याशी आहे,’ असा दम दिला. राखीव दलाच्या पोलिसांनी थेट एस.पीं.नाच आव्हान देण्याच्या प्रकाराने नाक्यावरील कर्मचारी व इतर वाहनधारकही अवाक् झाले. (प्रतिनिधी)
घडलेल्या प्रकाराची जातीनिशी चौकशी करू. अशा प्रकारावेळी वाहनधारकांनी लेखी तक्रार द्यावी. पोलीस फक्त नाक्यांच्या संरक्षणासाठीच आहेत. टोलवसुलीत हस्तक्षेप करणार नाहीत.
- मनोजकुमार शर्मा,
पोलीस अधीक्षक
शिये नाक्यावर अरेरावीचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. कर्मचारी व पोलिसांनी संयम राखावा. कोल्हापूरकरांच्या संयमाचा अंत पाहू नये. शिये नाक्यावरील प्रकारास आळा घालून त्यांना लवकरच अद्दल घडवू.
- आमदार राजेश क्षीरसागर