‘प्री-आयएएस सेंटर’च्या श्रीकांत कुलकर्णी, श्रीराज वाणी यांची ‘यूपीएससी’मध्ये बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST2021-09-25T04:26:22+5:302021-09-25T04:26:22+5:30
कोल्हापूर : येथील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या श्रीकांत माधव कुलकर्णी आणि श्रीराज मधुकर वाणी या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ...

‘प्री-आयएएस सेंटर’च्या श्रीकांत कुलकर्णी, श्रीराज वाणी यांची ‘यूपीएससी’मध्ये बाजी
कोल्हापूर : येथील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या श्रीकांत माधव कुलकर्णी आणि श्रीराज मधुकर वाणी या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवीत बाजी मारली. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी ‘यूपीएससी’ने जाहीर केला. श्रीकांत हे मूळचे कऱ्हाड, तर श्रीराज हे भुसावळ येथील आहेत.
यूपीएससीने जानेवारीमध्ये मुख्य परीक्षा घेतली. त्यानंतरच्या मुलाखतीचा टप्पा कोरोनामुळे लांबला. या मुलाखतीची प्रक्रिया बुधवारी (दि. २२) पार पडली. त्यानंतर शुक्रवारी निकाल जाहीर झाला. कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंगमध्ये शिक्षण, मार्गदर्शन घेणारे एकूण पाच विद्यार्थी मुलाखतीच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचले होते. त्यांतील श्रीकांत कुलकर्णी आणि श्रीराज वाणी यांनी यश मिळविले. या परीक्षेत ५२५ वी रँक मिळविणारे श्रीकांत यांनी सहाव्या प्रयत्नात यश मिळविले आहे. सध्या ते कोल्हापुरातील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात प्रवर्तन अधिकारीपदी कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई येथील न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकारीपदी काम केले आहे. त्यांचे वडील माधव हे कोयना दूध संघाचे निवृत्त व्यवस्थापक आणि आई आरती या गृहिणी आहेत. ४३० रँक मिळविणारे श्रीराज हे सध्या संगमनेर येथील कॅनरा बँकेत प्रोबेशन ऑफिसरपदी कार्यरत आहेत. ते पाचव्या प्रयत्नात या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्यांचे वडील मधुकर हे माध्यमिक शिक्षक, तर आई सुनंदा या एलआयसीमध्ये आहेत.
प्रतिक्रिया
यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झाल्याचा खूप आनंद होत आहे. त्यासाठी कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
-श्रीकांत कुलकर्णी.
आव्हानात्मक स्वरूपाच्या यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्याने आनंदित आहे. अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या जोरावर मला यश मिळविता आले.
-श्रीराज वाणी.
प्रतिक्रिया
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या प्रभारी संचालकपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. आमच्या सेंटरच्या दोन विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविल्याचा आनंद होत आहे.
-सोनाली रोडे
फोटो (२४०९२०२१-कोल-श्रीकांत कुलकर्णी (यूपीएससी), श्रीराज वाणी (यूपीएससी)