Kolhapur- Jyotiba Chaitra Yatra 2024: चांगभलंचा गजर अन् गुलालात न्हाली जोतिबाची स्वारी

By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 23, 2024 06:10 PM2024-04-23T18:10:28+5:302024-04-23T18:11:32+5:30

भर उन्हातही भाविकांची अलोट गर्दी

Sri Jotiba Chaitra Yatra was conducted with great enthusiasm | Kolhapur- Jyotiba Chaitra Yatra 2024: चांगभलंचा गजर अन् गुलालात न्हाली जोतिबाची स्वारी

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलं चा गजर, गगनचुंबी सासनकाठ्यांचा थाट, काठीचा तोल सांभाळत हलगीच्या कडकडाटावर रंगणारे तालबद्ध नृत्य, गुलाल खोबऱ्याची उधळण, मिरवणूक, पालखी सोहळा, आणि लाखो भाविकांच्या अलोट गर्दीत वाडी रत्नागिरी येतील दख्खनचा राजा श्री जोतिबाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. रणरणत्या उन्हाळ्यात आग ओकणाऱ्या सुर्यालाही भक्तीपुढे हरवत भाविकांनी यात्रेचा आनंद द्गिगुणीत केला. गुलाली रंगात आणि भक्तीसागरत डोंगर न्हाऊन निघाला.

महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र, गुजरात अशा विविध राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जोतिबा देवाची सर्वात मोठी चैत्र पौर्णिमेची यात्रा भरते. यासाठी गेल्या चार दिवसांपासून बैलगाडी, खासगी वाहने, बसेसमधून लाखो भाविक आपआपल्या गावच्या मानाच्या सासनकाठ्या घेऊन डोंगरावर दाखल झाले आहेत.

आज, मंगळवारी पहाटे श्रींचा अभिषेक झाल्यानंतर दरबारी पोशाखात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा महादेव गुरव, अंकुश दादर्णे, प्रविण कापरे, कुलदिप चौगुले, बाळकृष्ण सांगळे यांनी बांधली. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांच्या हस्ते निनाम पाडळी येथील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, बाळूमामा देवस्थानचे प्रशासक शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.

निनाम पाडळीनंतर विहे गावच्या दुसऱ्या क्रमांकाच्या काठीचे पूजन शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली. दुपारी चार वाजता तोफेच्या सलामीने श्री जोतिबा देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. शाही लव्याजम्यासह पालखी यमाई देवीच्या मंदिराकडे आली. येथे यमाई देवी व जमदग्नी ऋषीचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रींची पालखी पून्हा मंदिराकडे परतली. रात्री दहा नंतर पालखी साेहळा पूर्ण झाला

Web Title: Sri Jotiba Chaitra Yatra was conducted with great enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.