‘जोतिबा’साठी पथके सज्ज

By Admin | Updated: April 8, 2017 00:34 IST2017-04-08T00:34:00+5:302017-04-08T00:34:00+5:30

प्रशासनाचीही तयारी : चैत्री यात्रा आजपासून; सोमवारी मुख्य दिवस

Squads ready for 'Jyotiba' | ‘जोतिबा’साठी पथके सज्ज

‘जोतिबा’साठी पथके सज्ज

कोल्हापूर : अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासनासह विविध सेवा संस्थांच्यावतीने मोफत अन्नछत्र, येणाऱ्या भाविकांच्या दुचाकी नादुरुस्त झाल्या तर त्या मोफत दुरुस्त करण्याची तीन दिवस सोय केली आहे. यासह आरोग्यसेवाही मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच प्रशासनातर्फेही यात्रेची जय्यत तयारी म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे.

मंदिर रात्रभर खुले --देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर) कार्यालयाच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या केदारलिंग (जोतिबा) देवस्थान वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर)ची चैत्र यात्रा सोमवारी (दि. १०) होत आहे. त्यात पहाटे ५ ते ६ दरम्यान शासकीय अभिषेक, दुपारी २ ते सायं. ५:३० या वेळेत सासनकाठ्यांची मिरवणूक होणार आहे. सायं.५:३० वाजता ‘श्रीं’ची पालखी मंदिरातून यमाई मंदिराकडे निघेल.

मोफत दुरुस्ती
बाहेरून खासगी वाहनांतून येणाऱ्या भाविकांसाठी शहरातील दुचाकी दुरुस्ती संघटनांनी डोंगरमार्गावर मोफत टू-व्हीलर कॅम्पचे आयोजन केले आहे. यामध्ये टू-व्हीलर मेकॅनिक व्यावसायिक तसेच कर्मचारी संघटना सहभागी झाल्या असून, वाहनांची दुरुस्ती, पंक्चर यासारख्या सेवा पुरविल्या जाणार आहेत. या संघटनांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला आहे. यामध्ये जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक रिपेअर ओनर संघटना, टू-व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन रिसर्च संघटना व जिल्हा टू-व्हीलर पंक्चर फाउंडेशन यासारख्या संघटना ही सेवा देणार आहेत.

300 सुरक्षारक्षक
यात्रा कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार १०० तात्पुरती शौचालये, ३०० सुरक्षारक्षक, २५ वॉकीटॉकी, २० वाहनतळ, २० सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, ४५ हॅलोजन, ४० के.एम.टी. बस, अग्निशमन यंत्रणा सज्ज केल्या आहेत. जोतिबा मंदिराकडे १६ एचडी कॅमेरे तैनात केले असून त्याचे एक कनेक्शन आपत्कालीन नियंत्रण कक्षामध्ये देण्यात आले आहे; तसेच श्री यमाई मंदिराकडे चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ३०० सुरक्षारक्षकांसह दोन डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत.

‘अनिरुद्ध’चे ५०० हून अधिक स्वयंसेवक
भाविकांना दर्शनावेळी कोणतीही अडचण येऊन नये, कोणतीही गडबड होऊ नये यासाठी अनिरुद्ध बापू सेवा मंडळाकडून ५०० आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले स्वयंसेवक जोतिबा डोंगरावर तैनात करण्यात आले आहेत. शनिवारपासून हे स्वयंसेवक डोंगरावरील वाहनतळ, दर्शनरांगा, मंदिराच्या परिसरात तैनात केले जाणार आहेत.

असा असेल बंदोबस्त
पोलिस अधीक्षक१
अप्पर पोलिस अधीक्षक२
पोलिस उपअधीक्षक२
पोलिस निरीक्षक१७
सहा. पोलिस निरीक्षक८०
पोलिस कॉन्स्टेबल (पुरुष)५५०
पोलिस कॉन्स्टेबल (महिला)१५०
वाहतूक पोलिस २२०
होमगार्ड१५०
राज्य राखीव दल २ तुकड्या
जलद कृती दल २ तुकड्या



दर्शन पश्चिम दरवाजातून
मंदिरामध्ये दर्शनाकरिता पश्चिम दरवाजातून प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांसाठी मुख्य मंदिरामध्ये, शिवाजी पुतळा, पश्चिम दरवाजा, सेंट्रल प्लाझा आणि यमाई मंदिर येथे स्पीकरची व्यवस्था केली आहे. सुलभ दर्शन व्हावे यासाठी बॅरिकेटिंग, पश्चिम दरवाजा ते सिंदिया ट्रस्टपर्यंत तात्पुरत्या ओव्हरब्रिजची सोय केली आहे; तसेच मंदिर आवारातील फोल्डिंग ब्रिज, तात्पुरता ब्रिज व मंदिरातील विहीर सुस्थितीत खात्री केली जात आहे.
३०० एस.टींची सोय
गाभाऱ्यात स्मोक एक्स्ट्रॅक्टर असेल. पार्किंग, रस्ते, दिशादर्शक बोर्ड, लाईट व्यवस्था, ४० के.एम.टी. बसेसची, तसेच महामंडळाच्या वतीने ३०० एस. टी. बसची व्यवस्था तसेच जोतिबा मंदिराकडे २० केबी क्षमतेचा व यमाई मंदिराकडे १० केबी क्षमतेचा जनरेटर उपलब्ध आहे.वातानुकूलित रुग्णालय
व्हाईट आर्र्मीच्यावतीने यात्राकाळात तत्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सहा बेडचे सुसज्ज वातानुकूलित रुग्णालय सेंट्रल प्लाझा परिसरात उभारले आहे. अगदी हृदयविकाराच्या झटक्यापासून ते किरकोळ शस्त्रक्रियाही यामध्ये होणार आहेत. यासह ६० डॉक्टरांचे पथक, रेस्क्यू टीम, आपत्कालीन कक्ष अशा विविध सुविधाही ‘व्हाईट आर्र्मी’ पुरवेल.

Web Title: Squads ready for 'Jyotiba'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.