फरार दोघा दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना
By Admin | Updated: November 27, 2014 00:51 IST2014-11-27T00:38:07+5:302014-11-27T00:51:19+5:30
सोने लूटमार प्रकरण : सांगली, पुणे याठिकाणी वास्तव्य

फरार दोघा दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना
कोल्हापूर : बंगलोरहून केरळला खासगी ट्रॅव्हल्समधून प्रसिद्ध सराफाचे चार किलो सोने लूटणाऱ्या फरार दोघा दरोडेखोरांच्या शोधासाठी बंगलोर पोलिसांचे पथक सांगली व पुणे येथे रवाना झाले आहे. यापूर्वी अटक केलेल्या कोल्हापुरातील चार दरोडेखोरांना ताब्यात घेऊन पोलीस बंगलोरला रवाना झाले आहेत.
सराफ व्यापारी विकास कदम (रा. केरळ) यांचे दोघे कामगार चार किलो सोने घेऊन जब्बार ट्रॅव्हल्सच्या बसमधून बंगलोरहून केरळला जात असताना प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोने जबरदस्तीने लूटणाऱ्या कोल्हापुरातील सर्फराज मुझ्झफर खान (वय २८, रा. कदमवाडी), शलाल मोहंमद मकानदार (२७, रा. जुना बुधवार पेठ), जावेद ऊर्फ पप्पू हारुण शेख (३८, हुजूर गल्ली, भाऊसिंगजी रोड), रमीज रफिक चाऊस (२५, रा. बिंदू चौक) या संशयित दरोडेखोरांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांचा समावेश असल्याचे सांगितले. हे साथीदार यापूर्वी सराफ कदम यांच्याकडे कामगार म्हणून काम करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या माहितीवरूनच त्यांनी प्लॅनद्वारे सोने लुटले होते. त्या दोघा दरोडेखोरांचे वास्तव्य सांगली व पुणे याठिकाणी असल्याने बंगलोरचे पोलीस त्यांचा माग काढीत आहेत.