आजऱ्यात क्रीडासंकुल उभारणार
By Admin | Updated: December 9, 2014 23:17 IST2014-12-09T22:03:50+5:302014-12-09T23:17:17+5:30
नवनाथ फडतारे : १० जानेवारीपासून कामास सुरुवात

आजऱ्यात क्रीडासंकुल उभारणार
आजरा : आजरा शहरामध्ये एक कोटी रुपये खर्च करून होणारे क्रीडासंकुल हे संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत ठरेल. या क्रीडासंकुलाच्या जागेवर असणारी झाडे व विद्युत खांब हलविण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या असून, १० जानेवारीपासून क्रीडासंकुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फडतारे यांनी दिली.
आजरा येथील मंजूर क्रीडासंकुलाच्या उभारणीच्या हालचाली गतिमान झाल्या असून, या पार्श्वभूमीवर आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
फडतारे म्हणाले, मंजूर एक कोटी रुपयांपैकी ८७ लाख रुपये जिल्हा क्रीडा विभागाकडे जमा झाले आहेत. मंजूर एक कोटी रुपयांबरोबरच राजीव गांधी खेल अभियानांतर्गत आणखी एककोटी रुपयांचा निधी मंजूर होऊ शकतो. सदर संकुलामध्ये बहुउद्देशीय सभागृह, रनिंग ट्रॅक, वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळी मैदाने तयार करण्यात येणार आहेत. सर्वसोयींनी युक्तअसे आदर्श क्रीडासंकुल उभारण्यास प्रयत्नशील आहोत.
फडतारे यांनी भूमी अभिलेख विभागाने सदर संकुलासाठी निश्चित केलेल्या जागेचे मोजमाप करून वनखात्याला तातडीने कळवावे. वनखात्याने सदर जागेतील वृक्षांची मोजणी करून ती तोडून लिलाव पद्धतीने विक्री करावी. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीने या जागेवरून जाणाऱ्या वीज वाहिन्या हलविण्याच्या सूचना केल्या. संकुल उभारण्यासाठी ‘महसूल’ विभागाकडून सर्वप्रकारचे सहाय केले जाईल, असे आश्वासन तहसीलदार ठोकडे यांनी दिले.
तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम, परिक्षेत्र वनअधिकारी राजन देसाई, वीज कंपनीचे अभियंता सिकनीस, मंडल अधिकारी म्हाळसाकांत देसाई, बांधकामचे नवखंडकर, भूमी अभिलेखचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)