खेळच माझ्या भविष्याचा आधारवड : तेजस्विनी सावंत

By Admin | Updated: July 28, 2014 23:17 IST2014-07-28T23:06:02+5:302014-07-28T23:17:46+5:30

ई-लर्निंगचा शुभारंभ : शासनाने गुणवत्तेला स्थान दिल्यामुळे अनेक खेळाडूंना उभारी

Sports base for my future: Tejaswini Sawant | खेळच माझ्या भविष्याचा आधारवड : तेजस्विनी सावंत

खेळच माझ्या भविष्याचा आधारवड : तेजस्विनी सावंत

रत्नागिरी : क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी आता पूर्वीसारखे नकारार्थी वातावरण राहिलेले नाही. मलाही या खेळानेच घडवलं आणि वर्ग -१च्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली अन् भविष्यातील आधारवड मिळाला. त्यामुळे खेळाकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला रायफल शूटिंगची आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंत हिने दिला.
जिल्ह्यातील १७३ माध्यमिक शाळांना ई-लर्निंग सुविधेचा लाभ मिळणार आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते सोमवारी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झाले, त्याप्रसंगी ती बोलत होती.
पूर्वी खेळाबाबत नकारार्थी वातावरण होते. यामध्ये करिअर करायला कुणी तयार होत नसे. पण, आता परिस्थिती बदलली आहे. क्रीडाक्षेत्रात अनेक चेहरे पुढे येत आहेत आणि ते आयुष्यात स्थिरही होत आहेत. अनेक खेळाडू परिस्थितीशी झुंज देऊन पुढे आले आहेत आणि शासनाने त्यांच्या गुणवत्तेला स्थान दिल्याने त्यांच्या आयुष्याला उभारी मिळाली असल्याचे ती म्हणाली. खेळाडूंना आपले खेळातील प्राविण्य सिद्ध करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगून नोकरीत चांगल्या पदावर संधी देत आहे. मलाही आज शासन सेवेत वर्ग एक मध्ये खेळामुळेच संधी मिळाली असल्याचेही तिने सांगितले.
विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य लक्षात घेऊन पहिल्या टप्प्याशिवाय उर्वरित माध्यमिक शाळांना ई-लर्निंग सुविधेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८४ लाख निधीचा दुसरा टप्पा देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू योगिता खाडे, तारामती मतिमाडे, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेती नीशा जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा युवा केंद्र निर्माण करण्याची सरकारची योजना आहे. सध्या १० जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये सिंंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. दहावीनंतर मुलांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी युवा धोरणात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
क्रीडा विभागाने तयार केलेल्या क्रीडाधोरण माहिती पुस्तिका व क्रीडा दिनदर्शिकेचे प्रकाशन सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच ई-लर्निंगचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. (शहर वार्ताहर)

रत्नागिरीत युवा साहित्य संमेलन
नवीन क्रीडा धोरणात १३ ते ३५ वर्षे वयोगटातील युवांचा समावेश आहे. युवा साहित्य संमेलनासाठी तरतूद करण्यात आली असून, २०१५ साली रत्नागिरीत युवा साहित्य संमेलन घेण्याचा विचार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Sports base for my future: Tejaswini Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.