‘स्मार्ट कार्ड’साठी ज्येष्ठांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:48 IST2019-12-22T23:47:57+5:302019-12-22T23:48:36+5:30
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ घेणे अनिवार्य आहे. १ ...

कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक येथे स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी एकच खिडकी सुरू असल्याने ज्येष्ठांच्या लांब रांगा लागत आहेत.
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ घेणे अनिवार्य आहे. १ जानेवारीनंतर ज्या ज्येष्ठांकडे स्मार्ट कार्ड नाही त्यांना सवलतीचा लाभ मिळणार नसल्याने स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ज्येष्ठांची गर्दी लक्षात घेता काही खासगी केंद्रांतून ज्येष्ठांकडून वीस ते पन्नास रुपये जादा आकारले जात आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कागदी पासऐवजी महामंडळाकडून बँक व आधार क्रमांकाशी जोडलेले अत्याधुनिक ‘स्मार्ट कार्ड’ दिले जात आहे. महामंडळाच्या सर्व आगारांसह काही खासगी केंद्रांमार्फतही ज्येष्ठांना हे कार्ड तयार करून दिले जाते.
एक जानेवारीनंतर ज्येष्ठांना एस.टी. बसमधून प्रवास करताना स्मार्ट कार्ड नसेल तर सवलतीचा लाभ मिळणार नाही. स्मार्ट कार्ड काढून घेण्याची प्रक्रिया एक जानेवारीनंतरही चालू राहणार आहे. मात्र, याबाबत गैरसमज पसरवून ३१ डिसेंबरपर्यंत स्मार्टकार्ड मिळेल असा प्रचार केला जात असल्याने, ज्येष्ठांची स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक येथे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एकच केंद्र सुरूआहे. या ठिकाणी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यासह कामगार, आदी सवलतधारकांचीही पास काढण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. अनेकांना ताटकळत बसावे लागत आहे. त्यासाठी आणखी एक खिडकी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
खासगी केंद्रांवर
जादा आकारणी
ज्येष्ठ नागरिकांचे सवलती पास काढण्यासाठी फक्त ५५ रुपये इतके शुल्क आहे. मात्र, काही खासगी केंद्रांवर जलद काढून देण्याचे कारण पुढे करून ज्येष्ठांकडून ७० ते १०० रुपये घेतले जात आहेत.