बालकांना डोस देऊन पालकांची लुबाडणूक
By Admin | Updated: December 12, 2014 23:34 IST2014-12-12T22:51:54+5:302014-12-12T23:34:01+5:30
डॉक्टरांची मदत : सोलापुरातील संस्था

बालकांना डोस देऊन पालकांची लुबाडणूक
आळसंद : खानापूर तालुक्यासह आळसंद परिसरात ० ते १५ वर्षांच्या आतील मुलांना आयुर्वेदिक सुवर्णप्राश स्मरणशक्ती व बुध्दिवर्धक टॉनिक देण्याच्या नावाखाली सोलापूर येथील एका सेवाभावी संस्थेने लोकांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सेवाभावी संस्थेने ग्रामीण भागात एजंटांना कामाला लावून नोंदणी करण्यास सुरूवात केली असून शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून स्थानिक डॉक्टरांना हाताशी धरून या संस्थेने हा उद्योग सुरू केला आहे.
खानापूर तालुक्यातील आळसंद परिसरात काही तरूणांना ग्रामीण भागात पाठवून नोंदणी करण्याचे काम सुरू केले आहे. बुधवारी २० रूपये नोंदणी शुल्क आकारून गुरूवारी बालकांना प्रत्येकी १३० रूपये घेऊन डोस देण्यात आले. या डोसच्या शिबिरासाठी संस्थेने गुरुपुष्यामृताचा मुहूर्त काढला आहे. याचा उल्लेख नोंदणी कार्डावर करण्यात आला आहे. या शिबिराची कल्पना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर डॉ. लोखंडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक आळसंद येथे चौकशीसाठी पाठविले. त्यावेळी आळसंद येथील एका स्थानिक डॉक्टरच्या रुग्णालयात हा डोस देण्यात येणार होता, असे समजले. त्या रुग्णालयात पथक गेले असता, त्या ठिकाणी संबंधित संस्थेचे कोणीही कर्मचारी अथवा संस्थेचे डॉक्टर नव्हते. त्यामुळे पथक परत आले. त्यानंतर संस्थेशी संपर्क साधला असता संस्थेच्या प्रमुखांनी, आम्ही आरोग्य विभागाशी चर्चा केल्याचे सांगितले. आ
रोग्य विभागाने काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. या संस्थेच्या भूमिकेबद्दल उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
बुध्द्यांक वाढत असल्याचे भासवून सोलापुरातील संस्थेकडून डोस देण्यात येत आहेत. याची आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला कोणतीही कल्पना नसल्याचे चौकशीनुसार स्पष्ट झाले. मात्र संबंधित संस्थेचे प्रतिनिधी मात्रा प्रशासनाशी चर्चा करूनच आम्ही डोस देत असल्याची खोटी माहिती जनतेला देत आहेत. याची चौकशी होण्याची गरज आहे. (वार्ताहर)
गुरुपुष्यामृताचा मुहूर्त
नोंदणी कार्डावर बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्याच्या बुध्दिमत्तेचा विकास होण्यासाठी बालकास गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सुवर्णप्राश डोस अवश्य घ्या, अशी टीप नमूद केली आहे. मात्र, काल, गुरूवारी गुरूपुष्यामृत नसतानाही बालकांना डोस देण्यात आले. त्यामुळे संस्थेने गुरूपुष्यामृताचा मुहूर्त का नमूद केला, याची चर्चा परिसरात सुरू होती.