मांडव उभारणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:43+5:302021-09-09T04:30:43+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आणि महापुराच्या तडाख्यानंतर आपण ज्या लाडक्या विघ्नहर्त्याची वाट पाहत आहोत त्या गणरायाच्या स्वागताला ...

मांडव उभारणीला वेग
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आणि महापुराच्या तडाख्यानंतर आपण ज्या लाडक्या विघ्नहर्त्याची वाट पाहत आहोत त्या गणरायाच्या स्वागताला आता अवघा एक दिवस उरला आहे. त्यामुळे शहरात मंडळांच्या गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, तरुण मंडळांच्या वतीने मांडवांची युद्धपातळीवर उभारणी केली जात आहे.
गेली दोन वर्षे महापूर आणि कोरोना संसर्गाच्या दोन लाटांमुळे मागील वर्षी गणेशोत्सव शहरातील मंडळांनी विनावर्गणी अत्यंत साधेपणाने साजरा केला. कुठेही बेंजो, मोठा साउंड सिस्टम असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने व भक्तिभावाने हा सण शहरातील शेकडो मंडळांनी साजरा केला. यात कोठेही गाजावाजा नाही की कोठे घाईगडबड नाही. प्रत्येकाने जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध पाळून हा सण साजरा केला. यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. त्यामुळे मंडळांचा उत्साह दुणावला आहे. तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे कमी उंचीची गणेशमूर्ती व कमी उंचीचा मंडप टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरातील गणेश मंडळांनी प्रशासनाच्या हाकेला साद देत केवळ मंडप उभारणी केली आहे. यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे.
गेल्या दोन दिवसांत शहरातील शिवाजी चौक तरुण मंडळ, छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळ, शिवाजी तरुण मंडळ, जय शिवराय तरुण मंडळ, उमा टाॅकीज परिसरातील विश्वशांती तरुण मंडळ, लक्ष्मीपुरीतील जय शिवराय मित्रमंडळ, यासह शाहूपुरी, जुना बुधवार पेठ, डांगे गल्ली, शिवाजी पेठेतील काही मंडळांनी छोटे मंडप टाकले आहेत. गणेशमूर्तीही चार फुटांपर्यंतच्या तयार केल्या आहेत. काही तालीम मंडळांनी स्वत:च्या जागेतच केवळ गणेशमूर्ती बसविण्याची तयारी केली आहे. सलग दुसरे वर्ष कोरोनाच्या सावटाखाली असल्यामुळे तरुण मंडळांनीही उत्साहाला आवर घातला आहे. बहुतांशी मंडळांनी यंदाही वर्गणी न मागता मंडळाच्या सदस्यांकडून वर्गणी काढून सण साजरा करण्याचा नवा पायंडा पाडला आहे.
स्ववर्गणीचा नवा पायंडा
गेल्या दोन वर्षांपासून महापूर, कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे शहरातील बहुतांशी मंडळांनी आपल्या सदस्यांकडून वर्गणी जमवून गणेशोत्सव साजरा करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. याशिवाय ज्या नागरिकांची इच्छा असेल अशांकडून गणेशमूर्ती देणगीदाखल घेतली आहे. मंडपही आवरते टाकले आहेत.
फोटो : ०८०९२०२१-कोल-शाहूपुरी
ओळी : अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग शहरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शाहूपुरी चौथी गल्लीतील एका मंडळाचे मंडप उभारणीचे काम बुधवारी सुरू होते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)