पदाधिकारी निवडीच्या हालचाली गतिमान
By Admin | Updated: July 23, 2016 00:54 IST2016-07-23T00:48:57+5:302016-07-23T00:54:12+5:30
बाजार समिती : सभापतिपदासाठी सर्जेराव पाटील, संगीता पाटील यांची चर्चा

पदाधिकारी निवडीच्या हालचाली गतिमान
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती बदलण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, निवडणुकीनंतर झालेल्या समझोत्यानुसार सभापतिपदाची संधी राष्ट्रवादी कॉँग्रेसला मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून सर्जेराव पाटील-गवशीकर, संगीता पाटील यांची नावे चर्चेत असून, सभापतिपद राधानगरी तालुक्यात गेले तर उपसभापतिपदी राजे विक्रमसिंह घाटगे गटाच्या आशालता पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
एक वर्षापूर्वी बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य-सतेज पाटील गट-शेकाप यांच्या आघाडीने १९ पैकी १५ जागा जिंकत सत्ता कायम राखली. त्यानंतर झालेल्या समझोत्यानुसार सभापतिपद जनसुराज्य व राष्ट्रवादीला दोन-दोन वर्षे, तर एक वर्षे सतेज पाटील यांच्या गटाला देण्याचे ठरले आहे.
पहिल्या वर्षी जनसुराज्य पक्षाचे परशराम खुडे सभापती, तर सतेज पाटील गटाचे विलास साठे उपसभापती झाले. उपसभापतिपदासाठी राजे गटाच्या आशालता पाटील यांना संधी दिली जाणार होती; पण सतेज पाटील यांनी आग्रह धरल्याने त्यांचे नाव मागे पडले. ६ आॅगस्टला या पदाधिकाऱ्यांचा वर्षाचा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने नवीन निवडीसाठी संचालकांच्या पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. सभापतिपदासाठी ए. वाय. पाटील यांचे समर्थक सर्जेराव पाटील, संगीता पाटील यांची नावे चर्चेत आहेत. सभापतीवर उपसभापतीची निवड अवलंबून राहणार असून, जर सर्जेराव पाटील यांना संधी मिळाली तर आशालता पाटील यांची उपसभापतिपदी वर्णी निश्चित लागू शकते; पण पहिल्या टप्प्यात आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये सभापतिपद घ्यायचे ठरविले तर कृष्णात पाटील यांना संधी मिळू शकते. त्यावेळी उपसभापतिपदी ‘शेकाप’चे अमित कांबळे किंवा मानसिंगराव गायकवाड यांचे समर्थक शेखर येडगे यांची वर्णी लागू शकते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी १५ दिवस राहिल्याने इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
सलग सभापतीसाठी ‘जनसुराज्य’चा आग्रह?
पाच वर्षांत दोन वर्षे ‘जनसुराज्य’ला सभापतिपद मिळणार आहे. त्यामुळे सलग दोन वर्षे सभापतिपद घेण्याचा ‘जनसुराज्य’चा आग्रह असू शकतो. मागील पाच वर्षांत दत्तात्रय साळोखे यांना पहिली दोन वर्षे संधी दिली. तसे झाले तर विनय कोरे हे खुडे यांना पुढे चाल देणार की बाबा लाड यांना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.