भावी शाहिरांकडून दिमाखदार सादरीकरण
By Admin | Updated: November 11, 2014 00:12 IST2014-11-11T00:11:15+5:302014-11-11T00:12:14+5:30
शाहिरी कला प्रशिक्षण शिबिर : सरवडेत आयोजन; ५५ विद्यार्थ्यांचा सहभाग

भावी शाहिरांकडून दिमाखदार सादरीकरण
इचलकरंजी : शाहिरी कला प्रशिक्षण शिबिरांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी शाहिरीमधील विविध गीते व पोवाडे सादर केले. प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या ५५ शिबिरार्थींमध्ये ३० विद्यार्थी प्राथमिक शाळेतील, २४ विद्यार्थी हायस्कूलमधील व एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा समावेश होता.
हे शिबिर सरवडे (ता. राधानगरी) येथे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, शाहिरी व लोककला अकादमी, रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटी व संभू-राजू आध्यात्मिक मंडळ यांनी आयोजित केले होते.
सरवडे येथे दूधगंगा नदीकाठावर असलेल्या दत्त मंदिर कार्यालयामध्ये शिबिरार्थिंनी प्रात्यक्षिके सादर केली. महाराष्ट्राचे शाहीर आम्ही, शाहिरी मुजरा, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी गीत, शेतकरी गीत, कोळी गीत, ऐतिहासिक पोवाडा, महात्मा फुले गौरव गीत, आदी प्रकारचे दिमाखदार सादरीकरण करण्यात आले.
दरम्यान, शाहीर शीला पाटील-लोंढे यांच्या गणाने शिबिराच्या सांगता कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. शाहीर विजय जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संतोषी जांभळे, संजय रानमाळे यांची माहितीपर भाषणे झाली. यावेळी प्राथमिक व हायस्कूलमधील शिक्षक-शिक्षिका, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. शाहीर हिंदुराव लोंढे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सरवडे (ता. राधानगरी) येथील शाहिरी कला-प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर शाहीर नामदेव निकम, शीला लोंढे-पाटील, विजय जगताप, सखाराम खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते.