झोपडपट्ट्यांवर ‘विशेष वॉच’

By Admin | Updated: October 10, 2014 00:28 IST2014-10-10T00:27:35+5:302014-10-10T00:28:32+5:30

विधानसभा निवडणूक : कोल्हापूर शहरात १७ ठिकाणे संवेदनशील

'Special Watch' on slums | झोपडपट्ट्यांवर ‘विशेष वॉच’

झोपडपट्ट्यांवर ‘विशेष वॉच’

एकनाथ पाटील - कोल्हापूर -पैसा, भेटवस्तूंसह दारू वाटण्याचे काम गुन्हेगारच करू शकतात. पैशांचे आमिष दाखवून त्यांचा विधानसभा निवडणुकीत सर्रास वापर होण्याची दाट शक्यता असल्याने शहरातील संवेदनशील १७ झोपडपट्टी वसाहतींमध्ये पोलिसांनी ‘विशेष वॉच’ ठेवला आहे.
शहरातील ‘दादा’, ‘भार्इं’ यांच्या बारीक हालचालींवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टी परिसरात राजरोस चालणारी भाईगिरी, अवैध धंदे थंड पडले आहेत.
शहरातील झोपडपट्टी परिसर विशेषत: पोलिसांच्या सुरुवातीपासून रडारवर आहे. ‘गुन्हेगारांचे माहेरघर’ अशी ओळख शहरातील विशेषत: झोपडपट्टींची आहे. ‘भाईगिरी’च्या जोरावर दमदाटी करून पैसे उकळणे, चोऱ्या, घरफोडी करण्यामध्ये येथील तरुण-महिला आघाडीवर आहेत. पैशांसाठी वाट्टेल ते करणारे सुपारीबहाद्दूूर स्थानिक राजकीय नेते व सावकारांच्या दावणीला बांधले आहेत. निवडणूक, व्यवसायातील वसुली, कूळ काढणे, आदींसाठी येथील तरुणांचा वापर केला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोऱ्या, हाणामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगारांचे उठणे-बसणे या झोपडपट्ट्यांमधूनच आहे.
निवडणुकीत ‘साम-दाम-दंड-भेद’ या नीतिचा वापर करावाच लागतो. त्याची विशेष जबाबदारी या झोपडपट्टीदादांकडे दिली जाते. त्यामुळे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी झोपडपट्ट्यांवर विशेष लक्ष ठेवावे लागते. त्याचबरोबर परजिल्ह्यांतून आलेल्या गुन्हेगारांचे कनेक्शन हे झोपडपट्टीमधूनच होत असते. बहुतांशी हद्दपार गुन्हेगार झोपडपट्टीमध्ये येऊन वास्तव करतात. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे झोपडपट्टींमधून देवाण-घेवाण होत असते.
शहरात शाहूपुरी, राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संवेदनशील झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, शाहूनगर, यादवनगर, कनाननगर, सदर बाजार, शिवाजी पार्क, सुधाकर जोशीनगर, गंजीमाळ, बिडी कामगार चाळ, वारे वसाहत आदींचा समावेश आहे.
या झोपडपट्ट्यांतील ‘दादा’, ‘भार्इं’ यांच्यावर ‘विशेष वॉच’ ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांची विशेष पथके दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही, कुठल्याही क्षणाला झोपडपट्टी परिसरात फेरफटका मारत येथील प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

गुप्तहेर यंत्रणा लागली कामाला; प्रबोधनावरही भर
विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यांमध्ये अनेक छुप्या घडामोडींना वेग चढणार आहे. त्यासाठी पोलिसांनी रस्त्यांवरील फिरस्ते, वेश्या महिला, पानपट्टीचालक, रिक्षाचालक, बूट पॉलिशवाले अशा गुप्तहेरांना गल्ली-बोळांत, चौकांत, लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कुठे काय घडले, कोणी केले, याची परिपूर्ण माहिती हे ‘विशेष गुप्तहेर’ पोलिसांना देत आहेत.
कट्टा व मोहल्ला येथे बैठका घेऊन लोकांच्यात मतदानाबाबत प्रबोधन केले जात आहे. मतदानासाठी पैशांचा किंवा भेटवस्तूंचा मोह टाळावा. दारू, मटका, जुगार सुरू ठेवल्यास कठोर कारवाई केली जाईल. हद्दपार गुन्हेगारांना आसरा देऊ नये, पोलिसांना त्याची कल्पना द्यावी, कोणाच्याही दमदाटी, धमकीला बळी पडू नका, अशा पद्धतीने प्रबोधनावर जोर ठेवला आहे.

Web Title: 'Special Watch' on slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.