महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:35:30+5:302016-03-16T08:36:05+5:30
प्रदीप देशपांडे : अत्याचार, अन्याय थांबविण्यासाठी उपाययोजना

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती
कोल्हापूर : सार्वजनिक स्थळी, रस्त्यावर किंवा निर्जनस्थळी महिला, तरुणींच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष समिती नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील काही स्थळांची विशेष पथकाने पाहणी केली आहे. चोवीस तास महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सक्रिय असणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबईतील शक्ती मिल परिसरात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक स्थळी, रस्त्यावर किंवा निर्जनस्थळ परिसरात योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात छेडछाडीच्या प्रकारांमुळे महिला व तरुणींना घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. शहरात भाजीपाला खरेदीसाठी, देवदर्शनासह अन्य कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दोगिने चेनस्नॅचरकडून राजरोस लुटण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर छेडछाडीच्या प्रकारांमुळे महिला व तरुणींची मानसिकता खचत असून, त्यांच्या कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा गंभीर घटनांमुळे महिला व तरुणींचे जीवन असुरक्षित बनले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना तत्काळ जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन समिती नियुक्त करून उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या. या समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक देशपांडे आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, महावितरणचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचा समितीमध्ये समावेश आहे. सोमवारी (दि. १४) समितीची सुरक्षेसंदर्भात पोलिस मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी पोलिस अधीक्षक देशपांडे यांच्याकडे विचारपूस केली असता ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी समितीची स्थापना केली आहे. मुख्यालयातील महिला दक्षता समितीच्या वतीने शहरातील मैदाने, उद्याने, शाळा-कॉलेज, पर्यटनस्थळांची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, विजेची सोय, आदी सुविधा बसविण्यात येणार आहेत. समाजातील वाईट मनोवृत्तीच्या व्यक्तींकडून स्त्रियांवर होणारे अत्याचार व अन्याय थांबविण्यासाठी उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्थळांची निवड
एनसीसी भवन परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, राजाराम तलाव, आरकेनगर, केआयटी कॉलेजकडे जाणारा रस्ता व भारती विद्यापीठ परिसर, तपोवन मैदान, कोल्हापूर विमानतळ परिसर, कात्यायनी परिसर, सासने मैदान, रंकाळा परिसर, गांधी मैदान.