रस्त्यांच्या देखभालीसाठी ‘आयआरबी’ला खडे बोल
By Admin | Updated: March 12, 2015 23:51 IST2015-03-12T23:22:27+5:302015-03-12T23:51:28+5:30
कोल्हापूर रस्ता प्रकल्प : सुकाणू समितीची मुंबईत बैठक : १५ दिवसांत कामांची सुरुवात होणार

रस्त्यांच्या देखभालीसाठी ‘आयआरबी’ला खडे बोल
कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील अपुरी कामे, ट्रॅफिक आयलॅँड, वृक्षलागवड, पदपथ, रस्त्याकडेचे नाले यासंबंधीच्या अपूर्ण बाबींचा पाढा आयुक्त पी. शिवशंकर व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मुंबईत गुरुवारी झालेल्या रस्ते विकास प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत वाचला. ‘टोल घेता; मग रस्त्यांची आवश्यक देखभाल करण्यास काय हरकत आहे? टोलप्रश्न मिटेल तेव्हा पाहू. देखभालीची कामे तत्काळ सुरू करा, असे आदेश ‘एमएसआरडीसी’चे सहायक कार्यकारी संचालक संतोषकुमार यांनी दिले. यानंतर ‘आयआरबी’चे कर्नल एम. ए. अब्राहम यांनी पंधरा दिवसांत देखभालीची कामे सुरू करण्याचे आश्वासन दिले.
मुंबईतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) कार्यालयात अपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समितीची बैठक झाली. शहरातील अपूर्ण कामांची यादीच महापालिकेने बैठकीत सादर केली. टोलप्रश्न मिटविण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे, अशी भूमिका घेत ‘आयआरबी’ने अपूर्ण कामे व देखभालीबाबत हात वर करण्याचा बैठकीच्या सुरुवातीस प्रयत्न केला. रस्त्यासाठी टोलवसुली सुरू आहे; मग देखभाल खर्च करावाच लागेल, अशी भूमिका संतोषकुमार यांनी घेतली.
रस्त्यावरील खड्डे बुजविणे, विजेच्या खांबांची देखभाल व दुरुस्ती करणे, बंद असलेले विजेचे दिवे तत्काळ सुरू करणे, आदी रेंगाळलेली कामे पंधरा दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन आयआरबीच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिले. दर महिन्याला सुकाणू समितीची बैठक होणार असून, केलेल्या कामांचा आढावा घेण्याचे यावेळी ठरल्याचे नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)