सोयाबीनच्या टंचाईने शेतकरी घाईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST2021-05-07T04:23:52+5:302021-05-07T04:23:52+5:30
कोल्हापूर : चांगला दर मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. वळवाच्या पावसामुळे मशागतीची कामेही बऱ्यापैकी पूर्ण ...

सोयाबीनच्या टंचाईने शेतकरी घाईला
कोल्हापूर : चांगला दर मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. वळवाच्या पावसामुळे मशागतीची कामेही बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. काहीही करून रोहिणीचा पेरा साधायचा म्हणून तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर सोयाबीन बियाण्यांच्या टंचाईने मोठे संकट उभे केले आहे. अजूनही कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे उपलब्ध नाही. यावर कृषी विभागाने घरगुती बियाणे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची यादी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून तयार केली असून, त्यांच्याकडे संपर्क साधून बियाणे घ्यावे, असे आवाहन करण्यात आल्याने टंचाईत थोडा दिलासा मिळाला आहे.
दरावरून व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, कीड रोगांचा मारा, प्रचंड पाऊस यामुळे सोयाबीनचा पेरा गेल्या दोन वर्षांपासून घटला आहे. ५६ हजार हेक्टर असलेले क्षेत्र गेल्या वर्षी कसेबसे ३६ हजारांपर्यंत गेले. यावर्षी त्यात थोडीशी वाढ होऊन ते ४१ हजार ५०० हेक्टर इतके गृहीत धरण्यात आले आहे. यावर्षी हमीभावापेक्षाही दुप्पट भाव मिळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा सोयाबीन पेरणीच्या मानसिकतेत दिसत आहे. साधारणपणे फेरपालटाचे पीक म्हणून सोयाबीन लागण होते. ऊस लागणीसाठीच्या सऱ्या सोडून बोधावर सोयाबीन पेरले जाते. गेले महिनाभर वळवाच्या पावसाने चांगला हात दिल्याने जमिनीच्या मशागतीही वेगाने पूर्ण होत आहेत. रोहिणी नक्षत्रावर पेरणी केल्यास सोयाबीन चांगले येत असल्याने तो मुहूर्त समोर ठेवत सऱ्या सोडण्याचे काम जोरात सुरू आहे. ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी तर १५ मेपासूनच पेरण्या होणार असल्याने हे शेतकरी बियाण्याच्या शोधमोहिमेत गुंतले आहेत.
मध्यप्रदेशातून येणारी सोयाबीनची आवक तेथील राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे थांबली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात उत्पादित केलेल्या सोयाबीनचाच आधार घ्यावा लागणार असल्याचे दिसत आहे. कृषी विभागानेही यासाठीची पूर्वतयारी करून ठेवली आहे. १३ हजार क्विंटल सोयाबीनचे घरगुती बियाणे उपलब्ध होईल, असे नियोजन केले आहे. तालुकानिहाय अशा बियाणे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून ती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. पंचायत समितीत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे फोन करून आपापल्या भागातील संबंधित शेतकऱ्यांकडे जाऊन बियाणे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरातही दुपटीने वाढ
महाबीजने दरात वाढ करू नये, असे शासनाने कितीही सांगितले तरी सोयाबीनच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ७० रुपये किलो असलेले सोयाबीन आता १२० रुपये किलो दराने विक्री होणार आहे. सोयाबीनचा बाजारातील दर ८ हजार रुपये क्विंटल झाल्याने आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने ही वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे.
सोयाबीन बियाणे एकूण मागणी (क्विंटलमध्ये)
महाबीज : ८ हजार ८९०
खासगी : ४ हजार ७८
एकूण : १३ हजार ७७६
घरगुती : १३ हजार