देऊरला सोयाबीनपासून होणार दूधनिर्मिती
By Admin | Updated: July 28, 2015 00:29 IST2015-07-27T22:21:46+5:302015-07-28T00:29:27+5:30
परिवर्तनाची पहाट : दररोज एक हजार लिटर उत्पादनाचा संकल्प

देऊरला सोयाबीनपासून होणार दूधनिर्मिती
दुधासाठी गाय, म्हैस, शेळी ही संकल्पना बदलून आता सोयाबीनपासून पौष्टिकदूध व दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचा प्रयोग सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच देऊरमधील शेतकऱ्याने हाती घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची जोडणी पूर्ण झाली असून, थोड्याच दिवसांत हा प्रकल्प सुरूहोत आहे.
शेती व्यवसायात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल घडत आहेत. पिढीजात असलेल्या शेतीच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ही खेडोपाडी दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र,अलीकडच्या काळात हा व्यवसायही न परवडणाराच झाला आहे. जनावरांच्या वर्षभरातील पालनपोषण खर्चाचा हिशोब काढल्यास या व्यवसायातून शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही, असेच चित्र ग्रामीण भागात आहे.
आता घरबसल्या चार ते पाच लोकांच्या माध्यमातून प्रतिदिन १ हजार लिटर दुधाचे उत्पादन सोयाबीन पिकापासून होणार आहे. उत्पादित होणारे दूध हे किमान ३० दिवस खराब होत नाही.
दुधाबरोबरच पनीर, लस्सीसारखी दुग्ध उत्पादने घेतली जाणार असल्याने या उत्पादनास बाजारपेठेत मागणी चांगली राहणार आहे. व्यायामशाळा,वसतिगृह, हॉस्पिटल, हॉटेलमध्ये हे दूध स्ट्राबेरी, मॅगो या फ्लेवरमध्ये दूध मिळणार आहे.
गाई, म्हशीच्या दुधापेक्षा या दुधात ३० टक्के व्हिटॅमिन जास्त असल्याने शरीरासाठी हे दूध पौष्टिक मानले जात आहे. साधारण एक हजार लिटर दुधासाठी २०० ते २५० किलो सोयाबीन या प्रकल्पासाठी प्रतिदिन लागणार आहे. तयार दूध हे प्रक्रिया करून ३०० मिलीमीटरमधील बॉटलमध्ये पॅकिंग केले जाणार आहे. याची किंमत साधारणत: ३० ते २५ रुपये असणार आहे.
जिल्ह्यातील सोयाबीनपासून दूधनिर्मितीचा हा पहिलाच प्रकल्प सुरूहोत आहे. यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्रीची जोडणी पूर्ण होऊन याबाबत चाचणी यशस्वी झाली आहे. काही दिवसांतच हा प्रकल्प आता कार्यरत होऊन प्रत्यक्षात दुधाचे उत्पादन सुरू करणार आहे.