आजऱ्यात भात, सोयाबीनची पेरणी अंतिम टप्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:38+5:302021-06-09T04:29:38+5:30
आजरा : वळवाच्या पावसाने दिलेली साथ व वेळेवर झालेली शेतीची मशागत यांमुळे आजरा तालुक्यात रोहिणी नक्षत्रात भात व ...

आजऱ्यात भात, सोयाबीनची पेरणी अंतिम टप्यात
आजरा : वळवाच्या पावसाने दिलेली साथ व वेळेवर झालेली शेतीची मशागत यांमुळे आजरा तालुक्यात रोहिणी नक्षत्रात भात व सोयाबीनची पेरणी व टोकणणी अंतिम टप्प्यात आहे. पिकांची चांगली उगवण झाल्यामुळे शेतकरी राजा भाताची बाळ कोळपणी करण्यात मग्न आहे. मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने सायकल कोळप्याने कोळपणी सुरू आहे.
आजरा तालुक्यात २१९८३ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे उद्दिष्ट आहे. सर्वांत जास्त ९७०० हेक्टर क्षेत्रावर भातपेरणी, टोकणणी व रोपलागण पद्धतीने भाताचे पीक घेतले जाते. उत्तूर परिसरात जवळपास ८०० ते ९०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले जाते. सोयाबीन काढणी झाल्यानंतर त्याच ठिकाणी रब्बी हंगामातील शाळू, हरभरा, वाटाणा, गहू ही पिके घेतली जातात.
चालू वर्षी मे महिन्यातच वळवाचा पाऊस झाला. त्यापाठोपाठ वादळी वाऱ्याचाही पाऊस झाला. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर करण्यात शेतकऱ्यांना संधी मिळाली. रोहिणी नक्षत्रात भात व सोयाबीनचा पेरा करून मोत्याचा तुरा घेण्यासाठी गेल्या १५ दिवसांत झुंबड उडाली होती.
भातपेरणी व टोकणणीचे असणारे जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्र पूर्ण झाले आहे. भात व सोयाबीनची उगवण चांगली झाल्याने सध्या बाळ कोळपणी सुरू आहे. भुईमूग, मिरची, ज्वारी, तूर, नाचणा या पिकांचीही पेरणी सुरू आहे.
बाळकोळपणीसाठी शेतकरी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी डोळ्याने दिसेपर्यंत कोळपणीच्या कामात मग्न आहेत.
-------------------------
शाळा महाविद्यालयांची मुले कोळपणीसाठी
कोरोनाचे लॉकडाऊन व उन्हाळी सुट्टीमुळे शाळा व महाविद्यालयांची मुले घरीच आहेत. भात व सोयाबीनच्या कोळपणीसाठी आई-वडिलांना ही मुले मदत करताना दिसत आहेत. त्यातच बैलांची संख्या कमी झाल्याने कोळपणीसाठी मुलांचा वापर होताना दिसत आहे.
-----------------------
* रोपलागणीसाठी भाताचे तरवे टाकण्याची धांदल
आजऱ्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात भातरोप लावण केली जाते. या भातरोप लावणीसाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वळवाचा व वादळी वाऱ्याचा पाऊस झाल्याने नद्या, ओढे प्रवाहित झाले आहेत. भातरोप लागण्यासाठी तरवे टाकण्याचीही धांदल उडाली आहे.
-------------------------
फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे भाताला सायकल कोळपे घालताना शाळकरी मुलगा व दुसऱ्या छायाचित्रात आर्दाळ (ता. आजरा) येथे भाताला डोक्याची बाळकोळपणी करताना शेतकरी राजा.
क्रमांक : ०८०६२०२१-गड-०७/०८