दक्षिण महाराष्ट्र रेल्वे विकास परिषद भरवावी : सोळंकी
By Admin | Updated: December 24, 2014 00:54 IST2014-12-24T00:46:20+5:302014-12-24T00:54:48+5:30
रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. सन २०१५-१६ या वर्षात कोल्हापूरचे बहुतांश प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा

दक्षिण महाराष्ट्र रेल्वे विकास परिषद भरवावी : सोळंकी
कोल्हापूर : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर रेल्वेस्थानकातील समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी तसेच या रेल्वेस्थानकाच्या विकासाला चालना देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र रेल्वे विकास परिषदेचे तातडीने आयोजन करावे, तसेच या परिषदेला दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे अॅँड रोड पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी यांनी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या शहरांचा औद्योगिक विकास झाला आहे. पर्यटन, औद्योगिक, व्यापार, हॉटेल, आदी विकासाच्या दृष्टीने कोल्हापुरात भरपूर वाव आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. सन २०१५-१६ या वर्षात कोल्हापूरचे बहुतांश प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा सोळंकी यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
कोल्हापूर शहर कोकण रेल्वेला जोडल्यास रेल्वेचे पूर्व-पश्चिम जाळे विस्तारले जाऊ शकते. कोल्हापूरच्या पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात यावे, कोल्हापूर ते किर्लोस्करवाडी पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढवावी, डब्यांची संख्या वाढवावी, कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट गाडी सुरू करावी, कोल्हापूर-हैदराबाद व तिरूपती या गाड्या सोलापूरमार्गे सोडल्यास हैदराबादचे अंतर ३५० किलोमीटरने कमी होणार आहे.
रात्री सुटणारी कोल्हापूर-सोलापूर गाडी पूर्ववत सकाळी सोडण्यात यावी, आठवड्यातून एकदा धावणाऱ्या दिल्ली, अहमदाबाद गाड्या आठवड्यातून तीन वेळा सोडण्यात याव्यात.
जयपूर, अजमेर, जम्मू-काश्मीरसाठी नवीन गाड्या सुरू कराव्यात, कोयना एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, कोल्हापुरातील प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यात यावी, आदी मागण्यांकडे सोळंकी यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.