‘सौ’नीही पदर खोवला!

By Admin | Updated: October 10, 2014 00:16 IST2014-10-10T00:10:37+5:302014-10-10T00:16:01+5:30

सांभाळली प्रचाराची धुरा : वैयक्तिक भेटीगाठी, कोपरा सभा, पदयात्रांत सहभाग

'Sou'nhii Padar Khawla! | ‘सौ’नीही पदर खोवला!

‘सौ’नीही पदर खोवला!

इंदुमती गणेश - कोल्हापूर - विधासभेच्या रणांगणात उडी घेतलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या सौभाग्यवती त्यांच्या सारथी बनत प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने ज्या परिसरात अद्याप उमेदवार पोहोचू शकले नाहीत, त्या-त्या परिसराला प्राधान्य देत या सौभाग्यवतींनी प्रचारात सरशी घेतली आहे.
‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार सतेज पाटील यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांनी गेल्या आठ-दहा वर्षांपासून ‘गृहिणी महोत्सवा’च्या माध्यमातून महिलांचे संघटन केले आहे. प्रचारसभा, मेळावे, दौरे या माध्यमातून त्या आमदार पाटील यांच्या कामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. त्याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक या कागलचे घाटगे सरकार मृगेंद्रराजे घाटगे यांच्या कन्या. अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी त्या प्रत्येक गावात छोट्या-मोठ्या सभा घेत आहेत.
‘कोल्हापूर उत्तर’चे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली या कोल्हापुरातून तीनवेळा नगरसेवक पद भूषविलेल्या बापूसाहेब मोहिते यांच्या कन्या. माहेरी अगदी आजी-आजोबांपासूनच राजकीय पार्श्वभूमी आहे. भगिनी मंच आणि महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे केलेले संघटन ही त्यांची जमेची बाजू. अगदी घरोघरी जाऊन त्या मतदारांशी संवाद साधत आहेत. भाजपचे उमेदवार महेश जाधव यांच्या पत्नी आरती यादेखील शहरात फिरून मतदारांना जाधव यांनाच मत द्या, असे आवाहन करीत आहेत.
करवीर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांनीदेखील पतीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले आहे. हळदी-कुंकू, महिला मेळावे, सभा यांसह दारोदारी जाऊन त्या आमदार नरके यांच्या कामांची माहिती देत आहेत.
इचलकरंजी मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले प्रकाश आवाडे यांच्या पत्नी किशोरी आवाडे या स्वत: साडेसात वर्षे इचलकरंजीच्या नगराध्यक्षा होत्या. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहेच, शिवाय या काळात त्यांनी शहरात केलेली विकासकामे मतदारांना माहीत आहेत. त्यांनी महिला मतदारांवर आपले लक्ष केंद्रित केले असून हळदी-कुंकू, बैठका, पदयात्रेच्या माध्यमातून त्या प्रकाश आवाडे यांचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत.
माजी आमदार संजयबाबा घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पत्नी अरुंधती घाटगे या मूळच्या मुंबईच्या. माहेरी कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसतानाही या कोल्हापूरच्या सूनबाई राजकारणात सक्रिय आहेत. सध्या त्या ‘गोकुळ’च्या संचालिका आहेत.
कोल्हापूर उत्तरमधून कम्युनिस्ट पक्षाचे रघू कांबळे हे निवडणूक लढवत आहेत. वंचितांसाठी आणि ‘रस्त्यावर येऊन लढणारा कार्यकर्ता’ अशीच ओळख असलेल्या कांबळे यांच्या पत्नी शोभना यांनीदेखील त्यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले आहे.

अर्धांगिनीच्या रूपाने भक्कम पाठिंबा
विधासभेच्या रणांगणात पाऊल टाकलेल्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी त्यांच्या अर्धांगिनीच्या रूपाने भक्कम पाठिंबा मिळाला आहे. मतदारांचे मन वळविण्यात आणि धक्कादायक निकाल लागण्यात महिलांची मते निर्णायक ठरतात हे लोकसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झाल्याने सर्वच उमेदवारांनी महिला मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सौभाग्यवती त्यांना साथ देत आहेत.

Web Title: 'Sou'nhii Padar Khawla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.