छापा पडताच तरुणाने घेतली नदीत उडी
By Admin | Updated: January 21, 2015 23:50 IST2015-01-21T22:42:37+5:302015-01-21T23:50:03+5:30
तरुण बेपत्ता : मिरजेत जुगार खेळताना पोलिसांचा छापा

छापा पडताच तरुणाने घेतली नदीत उडी
मिरज : मिरजेत कृष्णा घाटावर नदीपात्रात आयुब इब्राहीम बेपारी (तारळेकर, वय ४०, रा. अत्तार गल्ली, मिरज) हा तरूण बेपत्ता झाला आहे. नदीघाटावर मंदिराशेजारी आयुब व त्याचे मित्र जुगार खेळत असताना अचानक पोलिसांचा छापा पडल्याने, पळून जाण्याच्या प्रयत्नात आयुब बेपारी हा नदीत पडल्याचा संशय आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात बेपत्ता आयुब बेपारी याचा सायंकाळपर्यंत शोध घेतला. मात्र तो सापडला नसल्याने उद्या सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.
आज दुपारी आयुब बेपारी व त्याचे चार मित्र नदीकाठी कृष्णा घाटावरील मार्कंडेश्वर मंदिराशेजारी निर्जन जागेत पत्त्यांचा जुगार खेळत होते. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तीन पोलीस कर्मचारी तेथे गेले. पोलिसांना पाहून जुगार खेळणाऱ्यांची पळापळ झाली. आयुबचे चार मित्र पळून गेले, मात्र आयुब पळून जाताना नदीपात्रात बेपत्ता झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी नदीच्या पलीकडच्या काठावर जाऊन आयुबचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
आयुब नदीत बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच नगरसेवक मैनुद्दीन बागवान, आयुबचे नातेवाईक व बोकड चौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कृष्णा घाटावर आले. त्यांनी तब्बल तीन तास पोलीस व स्थानिक नागरिकांसोबत नदीपात्रात आयुबचा शोध घेतला. नदीपात्रात पाण्याची पातळी कमी आहे. मात्र जॅकवेलजवळ नदीचे पात्र खोल असल्याने तेथे आयुब बुडाल्याच्या संशयाने शोधमोहीम सुरू होती. मात्र आयुब सापडला नसल्याने, तो नदीपात्रात बुडाला की पळून गेला, याबाबत संभ्रम होता. नदीकाठाशेजारी जुगाराचे साहित्य, आयुबचा मोबाईल, चप्पल सापडले आहेत. मात्र आयुब सापडत नसल्याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक हवालदिल आहेत.
आज सायंकाळी थांबविण्यात आलेली शोधमोहीम उद्या सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आयुब हा जनावरांच्या मांस विक्रीचा व्यवसाय करतो. मांस विक्री बंद आंदोलन सुरू असल्याने आयुब याच्यासह अन्य मांस विक्रेते आज दुपारी कृष्णाघाटावर गेले होते. तेथे त्यांचा पत्त्यांचा जुगार चालू असताना हा प्रकार घडला. (वार्ताहर)
पत्त्यांचा जुगार अदखलपात्र गुन्हा
पोलीस कारवाईच्या भीतीमुळे जुगार खेळणाऱ्यांची पळापळ होते. जुगार खेळणाऱ्यांकडून चिरीमिरी मिळत असल्याने पोलीसही जुगार खेळणाऱ्यांना पकडण्यासाठी उत्साहाने धावतात. आज मात्र जुगाराच्या छाप्यावेळी आयुब नदीत पडल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. आयुबला पोहता येत असतानाही तो गायब झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.