कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:00+5:302021-01-08T05:22:00+5:30
मुंबई मंत्रालयात आमदार आवाडेंसोबत बैठक (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमाग व आनुषंगिक औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी ...

कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात लवकरच
मुंबई मंत्रालयात आमदार आवाडेंसोबत बैठक
(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमाग व आनुषंगिक औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. लवकरच मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईत आमदार प्रकाश आवाडेंसोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले.
राज्यातील विकेंद्रित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांना अडचणी येत आहेत. या संदर्भात तत्काळ निर्णय होऊन मंडळाची स्थापना व्हावी, यासाठी आमदार आवाडे यांनी मंत्री वळसे-पाटील यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी मुंबई मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये आवाडे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. देशातील यंत्रमाग क्षेत्रातील सुमारे ६० टक्के यंत्रमाग महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामुळे त्यावर काम करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांना माथाडी कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करून विविध योजना द्याव्यात, ही बाब अनेक उदाहरणे देऊन पटवून दिली. त्याचबरोबर यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात माहिती दिली. चर्चेअंती मंत्री वळसे-पाटील यांनी या संदर्भात शासनस्तरावर लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
(फोटो ओळी) ०५०१२०२१-आयसीएच-०६
मुंबई येथे मंत्रालयात विकेंद्रित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणकारी मंडळासंदर्भात मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी आमदार प्रकाश आवाडे यांनी चर्चा केली.