नव्या निपाणी तालुक्याची लवकरच घोषणा
By Admin | Updated: October 17, 2014 00:52 IST2014-10-17T00:42:27+5:302014-10-17T00:52:48+5:30
काकासाहेब पाटील यांची माहिती : अर्थसंकल्पापर्यंत शक्य

नव्या निपाणी तालुक्याची लवकरच घोषणा
निपाणी : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बंगलोर येथे भेट घेऊन निपाणी तालुका निर्मितीची गरज स्पष्ट केली होती. त्यानुसार या प्रक्रियेला आता गती आली असून, दि. १ नोव्हेंबर ते अर्थसंकल्पापर्यंत त्याची घोषणा होणार असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. निपाणी येथे आज, गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी आपणासह आमदार वीरकुमार पाटील यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. नव्या निपाणी तालुक्यात निपाणी, कोगनोळी, जत्राट, लखनापूर, पडलिहाळ, शिरगुप्पी, कोडणी, शेंडूर, गोंदुकुप्पी, सौंदलगा, हंचिनाळ, कुर्ली, यरनाळ, गवाणी, तवंदी, आप्पाचीवाडी, अकोळ, पागिंरे बी, बुधलमुख, यमगर्णी, नांगनूर, बुद्धिहाळ, बेनाडी, मत्तिवडे, हदनाळ, भाटनांगनूर, आदी गावांसह ५४ गावांचा सभावेश आहे. वरील गावांपैकी आडी, लखनापूर, पट्टणकुडी, खडकलाट, नवलिहाळ आणि निपाणी नगरपालिकेने तालुका निर्मितीसाठीचा ठराव केलेला नाही. त्या ग्रामपंचायतींनी तत्काळ ठराव करून २७ आॅक्टोबरपूर्वी तालुका कार्यालयात पोहोच करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. सुरुवातीपासूनच निपाणी तालुक्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. आता नव्या तालुक्याची घोषणा झाल्यानंतर त्याचा सर्वांना लाभ होणार असल्याचे काकासाहेब पाटील यांनी सांगितले.
यावेळी निपाणी भाग कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष गोपाळ नाईक, बेडकीहाळ भाग कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप जाधव, पंकज पाटील, सुजय पाटील, राकेश कदम, बाबूराव खोत, राज पठाण, अशोक असोदे, प्रवीण भाटले, सुनील पाटील, राजेंद्र चव्हाण, धनाजी निर्मळे, रघुनाथ चौगुले, बंडा पाटील, चेतन स्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हुक्केरी तालुक्यातील शिप्पूर, नांगनूर, हिटणी, कणगला, करजगा, हरगापूर, सोलापूर, कोनकेरी, बुगटे अल्लूर, हडलगा, शेकीन हसूर, मत्तवाड, भैरापूर, राशिंग आणि व्हन्नोळी ही गावे एम. बी. प्रकाश कमिटीप्रमाणे निपाणी तालुक्यात येऊ शकतात. त्यासाठी या ग्रामपंचायतीनीही तत्काळ ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयास पोहोचविण्याचे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले.