भाजीपाला विकायचा तरी कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:23 AM2021-04-19T04:23:15+5:302021-04-19T04:23:15+5:30

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न ...

Somewhere to sell vegetables | भाजीपाला विकायचा तरी कुठे

भाजीपाला विकायचा तरी कुठे

Next

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. भाजीपाला हा नाशवंत असल्याने एक-दोन दिवसातच त्याची विक्री होणे आवश्यक असते, पण विक्रीसाठीची व्यवस्थाच नसल्याने पुन्हा एकदा भाजीपाला घेऊन दारोदारी भटकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था असताना भाजीपाला विकून गुजराण करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना मंडई, अथवा रस्त्यावर बसून विक्रीस मज्जाव असल्याने तेही परिस्थितीसमोर हतबल झाले आहेत.

भाजीपाला ही जीवनावश्यक गरज असलीतरी लोक शिस्त पाळत नसल्याने विक्रीस प्रशासनाकडून मज्जाव घालण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दोन दिवसांपासून खरेदीची मुभा दिली होती, पण कोणतेही नियम पाळले जात नसल्याने संसर्गाची वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने रस्त्याकडेला देखील विक्रीस बसण्यास निर्बंध घातले आहेत. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारे शेतकरी बाजार समितीत सौद्याला माल पाठवत आहेत, पण तेथेही मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी दर निम्म्यावर आणले आहेत. शेतात कुजण्यापेक्षा औषध पाण्याचा तरी खर्च निघू दे म्हणून शेतकरी माल व्यापाऱ्यांना घालत आहेत.

पण याच वेळी छोट्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. या दिवसात काकडी, कलींगड, गवारी, दोडका यांच्यासह भेंडी, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर यांची मागणी बाजारात जास्त असते, ही मागणी लक्षात घेऊन त्याचे उत्पादन क्षेत्र वाढलेले असते. या सर्व भाज्या दरराेज तोडून त्या विक्रीस पाठवाव्या लागतात. छोटे शेतकरी गावातील आठवडी बाजारासह शहरातील मंडईमध्ये येऊन भाज्यांची विक्री करतात. पण आता त्यांना वाहतूकीसह रस्त्यावर बसण्यासही मज्जाव आल्याने हातातोंडाशी आलेले उत्पादन विकायचे कुठे असा प्रश्न सतावू लागला आहे. बाजार समितीसह शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो दिवसभर बसून विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची अवस्थाही वाईट आहे. कोरोनाची भीती असली तरी त्यापेक्षाही पोटापाण्याची भीती जास्त आहे. ते भरण्यासाठी रोजची विक्री होणे आवश्यक आहे, पण कोरोनाच्या भीतीने झालेल्या लॉकडाऊनने सर्व चक्रच मोडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यातून मध्यममार्ग काढण्याची मागणी होत आहे.

Web Title: Somewhere to sell vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.