सोमय्या मंगळवारी पुन्हा येणार, राष्ट्रवादी काय करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:34+5:302021-09-23T04:28:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पहिल्या फेरीत कऱ्हाडमधून परत पाठवून दिलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा मंगळवार, दि. २८ ...

Somaiya will come again on Tuesday, what will the NCP do! | सोमय्या मंगळवारी पुन्हा येणार, राष्ट्रवादी काय करणार!

सोमय्या मंगळवारी पुन्हा येणार, राष्ट्रवादी काय करणार!

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पहिल्या फेरीत कऱ्हाडमधून परत पाठवून दिलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा मंगळवार, दि. २८ सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दुसऱ्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी सोमय्या यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही लेखी पत्र पाठवून दौऱ्याची आगावू अधिकृत कल्पना दिली आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील शुक्रवारी कागलमध्ये दाखल होत आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी १२७ कोटींच्या घोटाळ्याचा १३ सप्टेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोप केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात आगडोंब उसळला. अशातच सोमय्या यांनी २० सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यात येऊन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कारखान्याची पाहणी करणार असल्याची घोषणा केली. यावरून वातावरण आणखी तापले. या सगळ्यामध्ये सोमय्या यांना मुंबईपासून रोखण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापुरात त्यांना येण्यावर बंदी घातली. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले. अखेर सोमय्या कऱ्हाडमध्ये उतरले आणि मुश्रीफांवर दुसरा आरोप करून मुंबईला परत गेले. आता त्यांनी आपण मंगळवारी २८ सप्टेंबरला कोल्हापूरला येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही पत्र लिहिले आहे. दौऱ्याचा कार्यक्रम लिहून योग्य व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे.

चौकट

सोमय्या यांच्या दौऱ्याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनास मिळाले आहे. त्याबाबतचे नियोजन दोन दिवसांत केले जाईल.

राहुल रेखावार,

जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

घोरपडे कारखान्यास बाहेरून भेट

मंगळवारी सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने आगमन, शासकीय विश्रामगृह, बाहेरूनच अंबाबाई दर्शन, शहर भाजप कार्यालय भेट, दुपारी १२ वाजता संताजी घोरपडे कारखान्याला बाहेरून भेट, मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये जाणार, पोलीस अधीक्षकांची भेट, ग्रामीण आणि शहर पदाधिकारी भेट आणि रात्री पुन्हा महालक्ष्मी एक्स्प्रेसने मुंबईला रवाना

चौकट

पुन्हा धुरळा उडणार का.....

सोमय्या यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली होती, तर काँग्रेस, शिवसेनेनेही मुश्रीफ यांची पाठराखण केली. गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस व्यस्त असल्याने सोमय्या यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. आता या नव्या दौऱ्यासाठी प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Somaiya will come again on Tuesday, what will the NCP do!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.