मुश्रीफांना अंगावर घेणारे सोमय्या सोमवारी कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:23+5:302021-09-17T04:29:23+5:30
कोल्हापूर : महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे बाहेर काढून त्यांना जेरीस आणणारे किरीट ...

मुश्रीफांना अंगावर घेणारे सोमय्या सोमवारी कोल्हापुरात
कोल्हापूर : महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे बाहेर काढून त्यांना जेरीस आणणारे किरीट सोमय्या सोमवार, २० सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कथित १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या सोमय्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरण्याची शक्यता असल्याने वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
सोमय्या यांनी चार दिवसांपूर्वी मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांच्या संताजी घोरपडे या कारखान्यासाठी बेकायदेशीररीत्या पैसे वळवले असून, यातून हा मनी लाँड्रिंगचा घोटाळा केल्याची २७०० कागदपत्रे त्यांनी ‘ईडी’कडे सादर केली आहेत. या पार्श्वभूमीवर सोमय्या सोमवारी सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापुरात येणार आहेत. जिल्ह्यात ते नेमके कुठे जाणार आहेत हे अजूनही निश्चित झालेले नाही. मात्र ते कागल, आजरा आणि भुदरगड या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या संताजी घोरपडे कारखान्याला भेट देण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापुरात त्यांची पत्रकार परिषद होईल, असे समजते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज शुक्रवारी कोल्हापुरात येणार असून, त्यानंतर सोमय्या यांचा जिल्ह्यातील दौरा निश्चित केला जाईल. त्याबाबतची पत्रे शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुखांसह सर्वांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
मुश्रीफ रविवारी कागलमध्ये
घोटाळ्याच्या आरोपानंतर मुंबईला गेलेले मंत्री हसन मुश्रीफ हे रविवारी सकाळी कागलमध्ये दाखल होणार आहेत. त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मंत्री सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही मुश्रीफांची पाठराखण केल्यामुळे सोमय्या यांना प्रखर विरोधास सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.