शिक्षकांचे प्रशासकीय पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडवू : वर्षा गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:24+5:302021-01-17T04:22:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिक्षकांनी एकत्रित येऊन मूळ पाच प्रश्न द्यावेत, त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू. जे प्रश्न प्रशासकीय ...

शिक्षकांचे प्रशासकीय पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडवू : वर्षा गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिक्षकांनी एकत्रित येऊन मूळ पाच प्रश्न द्यावेत, त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू. जे प्रश्न प्रशासकीय पातळीवरील अडकले आहेत, ते प्राधान्याने मार्गी लावू, अशी ग्वाही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. महाराष्ट्र गुणवत्तेत अव्वल यावे, ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी असून, उद्याच्या महाराष्ट्रात हजारो डिसले गुरुजींसारखे जागतिक दर्जाचे शिक्षक निर्माण व्हावेत असे दर्जेदार शिक्षण द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय परिषद शनिवारी कोल्हापुरात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील होते.
मंत्री गायकवाड म्हणाले, प्राथमिक शाळांतील रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने सहा हजार शिक्षक भरतीसाठी मंजुरी घेतली आहे. महापालिका शिक्षकांसह इतर प्रश्नांबाबत उद्या, सोमवारी नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक आहे. पदोन्नतीसह इतर मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करू, तुम्ही मात्र गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील रहा.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोकणातून १६०० शिक्षक इतर जिल्ह्यांत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र तिथे शिक्षक भरल्याशिवाय हे करता येत नाही. शिक्षकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच, मात्र काळानुरूप त्यांनी बदलले पाहिजे. कोरोनाने आपणास खूप शिकवले असून आता डिजिटल शिक्षणाकडे वळले पाहिजे. आगामी काळात गोरगरीब विद्यार्थ्यांना मोबाईल देऊन त्यांनाही या प्रवाहात आणले पाहिजे, नावीन्यपुर्ण योजनेतून तालुक्यातील दहा शाळा डिजिटल करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घ्यावा.
------------------------------------------------------
दहावी-बारावीची परीक्षा एप्रिलच्या अखेरीस
कोरोनामुळे एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. यामुळेच दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिलच्या अखेरीस घेण्याचे नियाेजन असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
------------------------------------------------------
उपक्रमशील शिक्षकांनाच यापुढे राज्य पुरस्कार :
फाईलने नाही, ऑनलाईन येणारे आणि चांगले उपक्रम राबविलेल्यांनाच यापुढे राज्य शासनाचे शिक्षक पुरस्कार दिले जातील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
------------------------------------------------------
शिक्षकांच्या बदल्यांबाबत माझ्याकडे उत्तर नाही : हसन मुश्रीफ
पती-पत्नी सोयीची बदली, आई-वडील आजारी, हवामान मानवत नाही म्हणून बदल्या करण्याचा आग्रह शिक्षकांचा असतो. गेल्या दहा महिन्यांत शिक्षकांच्या बदल्यांबाबत मलाच उत्तर सापडलेले नाही. सर्व संघटनांनी एकत्रित यावे आणि बदल्यांचा अध्यादेश काढावा, आपण डोळे झाकून सही करतो, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.