कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील महादेवी हत्तीण परत द्या अशा मागणीसाठी कोल्हापूरकरांनी रविवारी काढलेल्या आत्मक्लेश माेर्चानंतर लोकांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी सकाळी १०:३० वाजता मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीकडे कोल्हापूरकरांचे विशेषत: नांदणीतील रहिवाशांची नजर लागून राहिली आहे. सरकारने हस्तक्षेप करून कायदेशीर बाबींची व्यवस्था केली तर नांदणी मठ तशी भूमिका घेईल, असे विश्वस्त सागर शंभूशेटे यांनी सांगितले आहे.दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक असते. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात लोकप्रतिनिधींची आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांची ही बैठक होणार आहे. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री गणेश नाईक, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वन्यजीवचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार, लोकप्रतिनिधींसह नांदणी मठाचे विश्वस्त सागर शंभूशेटे, भालचंद्र पाटील, अप्पासो गोगटे, सागर पाटील, ॲड. मनोज पाटील यांच्यासह वनविभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
न्यायालयाचा मान राखूनच आम्ही महादेवी हत्तिणीला पाठवले आहे. महादेवी हत्तीण आम्हाला परत द्या, ही आमची भावना आहे. सर्वधर्मीयांनीच महादेवीला परत आणावे यासाठी चळवळ उभा केली आहे. वनतारा तिच्या आरोग्याबाबत नांदणी येथे व्यवस्था करणार असेल तर मठाची हरकत नाही. सरकारनेही हस्तक्षेप करून कायदेशीर बाबीची व्यवस्था केली तर आम्हीही मठाकडून तशी भूमिका घेऊ. -सागर शंभूशेटे, विश्वस्त