पेठवडगाव पालिका बसविणार सौर ऊर्जा युनिट
By Admin | Updated: December 5, 2014 00:21 IST2014-12-05T00:11:49+5:302014-12-05T00:21:20+5:30
सभेत निर्णय : दरमहा होणार दोन लाख रुपयांची वीज बचत

पेठवडगाव पालिका बसविणार सौर ऊर्जा युनिट
पेठवडगाव : वीज बचाव मोहिमेंतर्गत सोलर युनिटद्वारे कार्यालय व पथदीप कार्यान्वित करून दरमहा दोन लाख रुपयांची बचत करण्याचा निर्णय पेठवडगाव पालिकेच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान, विकासकामात दिरंगाई केल्याबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. स्वच्छतेविषयक सूचना देऊनही कामे होत नसल्याची बोचरी टीका यावेळी झाली.
नगरपालिकेच्या सभेत विविध १६ विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विद्या पोळ होत्या.
पालिकेच्या इमारतीवर सोलर युनिट आणि स्ट्रीट लाईटवर लीड बल्ब बसविण्यात येणार आहेत. सौर ऊर्जा युनिटमुळे महिन्याला ५७ हजारांची, तर स्ट्रीट लाईटची ७० ते ८० हजार रुपयांची बचत होणार आहे. नगराध्यक्षा पोळ म्हणाल्या, एस. टी. स्टँड समोरील खासगी जागेत बांधकामाचा पाया काढला आहे. हे काम अनेक वर्षे रखडल्यामुळे तिथे पाणी साठले असून, त्यामध्ये मेडिकलसह अन्य कचरा टाकला जातो. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे संबंधित जागा मालकावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी खड्ड्यांचा प्रश्न मांडला. स्टँडजवळ गटारीमध्ये मैला मिश्रित पाणी सोडले जाते. त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा मांडला.
रंगराव पाटील यांनी रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व टेंडरप्रमाणे करावीत, असा आग्रह धरला. संतोष गाताडे यांनी सावर्डेकर ते चिंगळे गल्ली रस्त्याचे काम दर्जेदार होत नसल्याचा आरोप केला. याबाबत नोटिसा काढल्या असून कारवाई करणार असल्याचा खुलासा प्रशासनाने केला. त्याला सर्वच नगरसेवकांनी विरोध करून ठोस कृती करण्याचा सल्ला प्रशासनास दिला.
पालिकेतील पाणपोईच्या जागी पोलीस चौकी करणे, यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
यावेळी विजयसिंह यादव, राजू देवस्थळी, सुनील हुकेरी, अभिजित पोळ, गीता कोरे, निर्मला सावर्डेकर, ऊर्मिला उडाळे, आदींनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)
५पिता-मुलगीचा सत्कार
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर तसेच ‘लोकमत’ आयकॉनपदी निवड झाल्याबद्दल नराध्यक्षा विद्या पोळ व नगरसेवक विजयसिंह यादव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.