सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:03+5:302021-06-18T04:18:03+5:30
इमारतीस गळती, जीर्ण इमारतीमुळे आरोग्य सेवेवर परिणाम सोळांकूर : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे ...

सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे
इमारतीस गळती, जीर्ण इमारतीमुळे आरोग्य सेवेवर परिणाम
सोळांकूर : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीवरील पत्रेही वादळामुळे उडून गेल्याने तसेच दोन्ही इमारतच्या जीर्ण स्लॅबमुळे गळती लागून दवाखान्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे उपचारादरम्यान रुग्णांचे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हाल होत असून आरोग्य सेवा देताना कुचंबणा होत आहे. त्याचप्रमाणे गळती लागल्याने तांत्रिक उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. निपाणी-राधानगरी या राज्यमार्गालगत असणारी जवळपास पंधरा फूट लांबीची संरक्षक भिंत ही कोसळली आहे.
चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाची इमारत आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. दरवर्षी पत्रे उडून सतत भिंतीतून पाणी पाझरून खिडक्या-दारेही फुटलेली आहेत. त्यामुळे विद्युत करंट भिंतीत उतरत आहे तर काही ठिकाणी स्लॅब कोसळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक रुग्ण इतर उपचाराकरता खेड्यापाड्यातून येथे येत आहेत. सध्या दवाखान्यात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. संपूर्ण दवाखान्याला गळती लागल्यामुळे इमारतीतील प्रत्येक विभागात दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा विपरीत परिणाम दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर रुग्णांवर होत आहे.
दूधगंगा काठावरील ५० गावांच्या नागरिकांच्या आरोग्याचे भवितव्य अवलंबून आहे. तर संपूर्ण तालुका शवविच्छेदनासाठी अवलंबून आहे.
दवाखान्याच्या नवीन बांधकामासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी १५ कोटी ३६ लाख इतकी रक्कम मंजूर केली असून त्याचा आराखडाही तयार आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे काम सुरू केले नाही. आता तरी लवकरात लवकर बांधकाम ठेकेदाराकडून करून घेऊन रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी रुग्णालय पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील व पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.
चौकट इमारतीच्या डागडूजीबाबत व नवीन बांधकामबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. पावसाचे प्रमाण अधिक आहे. पत्रे उडाले आहेत. रुग्णांना सेवा देण्यासाठी इमारतीची त्वरित दुरुस्ती करून मिळावी. डॉ. पद्मावती भोकरे (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय सोळांकूर)
कट २. वादळामुळे पत्रे उडाले आहेत व पूर्वीचे बांधकाम असल्याने इमारतीची दुरवस्था होऊन गळती लागलेली आहे. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली असून थोडी पावसाने उघडीप दिल्यावर दुरूस्तीचे काम करून नवीन इमारत बांधकाम लवकर सुरू करण्यास प्रयत्नशील आहे.
अमित पाटील (उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी)
१७ सोळांकूर ग्रामीण रुग्णालय
फोटो ओळ-
सोळांकूर, ता. राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे उडालेले पत्रे व स्लॅब.