मातीला ‘देव’पण देणारा समाज
By Admin | Updated: July 27, 2015 00:28 IST2015-07-27T00:08:46+5:302015-07-27T00:28:21+5:30
बलुतेदारीची जपणूक : कलानगरीच्या चित्र-शिल्प परंपरेत अनेक समाजबांधवांचा वाटा--लोकमतसंगे जाणून घेऊ

मातीला ‘देव’पण देणारा समाज
इंदुमती गणेश - कोल्हापूर -बारा बलुतेदारांपैकी महत्त्वाचा घटक असणाऱ्या कुंभार समाजाला देव घडविण्याचा मान आहे. प्रथमपूज्य देव श्री गणेशाच्या विविध मूर्तींपासून ते दुर्गामाता, नागोबा, बेंदराचे बैल, नवरात्रात लागणारी लोटकी, पाण्याचे माठ, मडकी असे मातीपासून बनविले जाणारे अनेक साहित्य हे या समाजाचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. आजही आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहत कुंभार समाजाने ही बलुतेदारी जपली आहे. पूर्वीच्या काळी वस्तूची देवाणघेवाण हेच चलनाचे माध्यम होते. समाजव्यवस्थेत प्रत्येक कुटुंबात लागणारी मातीची भांडी कुंभारबांधव तयार करत. त्या बदल्यात त्यांना अन्य बलुतेदारांकडून अन्न-धान्य अशा विविध प्रकारच्या साहित्यांची देवघेव केली जात असे. पूर्वी फक्त
गाडगी, डेरे, खापऱ्या, कुंड्या बनविण्याचे काम केले जाई. पुढे त्यात सुधारणा होत वीट बनविण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्यानंतर घरोघरी आणि मंडळामध्ये गणेशमूर्तीचे पूजन मोठ्या प्रमाणात सुरू झाले, तेव्हापासून कुंभारबांधवांनी देव घडवण्याचा कार्याला सुरुवात केली, ही परंपरा आजतागायत सुरू आहे.
या समाजाचे आराध्य दैवत म्हणजे जोतिबा आणि तुळजाभवानी. कोल्हापूर जिल्ह्यात ८० हजार आणि शहरात १५ ते २० हजार अशी लोकसंख्या आहे. शहरातील उद्योग बाहेर हलविण्यासाठी शासनाने समाजाला बापट कॅम्प येथील २५ एकर जागा दिली. समाजाने ती खरेदी करून येथे संत गोरा कुंभार वसाहत वसवली. याशिवाय शाहूपुरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, बजापराव माजगावकर तालीम, जोशी गल्ली, ऋणमुक्तेश्वर, धोत्री गल्ली, पापाची तिकटी या परिसरात कुंभारबांधव मोठ्या संख्येने राहतात. समाजाची कुमावत को- आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्था असून, त्याद्वारे समाजबांधवांना
आर्थिक मदत केली जाते. अष्टकुंभार दैव मंडळाच्यावतीने बाराव्या दिवसांचे विधी केले जातात. कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने कुंभारांना शाडू-मातीसह मूर्ती तयार करण्यासाठी कच्चा माल पुरविला जातो. समाजाने आजही काही ठिकाणी बलुतेदारी जपली आहे. आपला पिढीजात व्यवसाय सांभाळत समाजातील तरुणाईने शिक्षणाद्वारे प्रगतीच्या वाटा धुंडाळल्या आहेत. अनेकजणांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील आहेत. समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण जास्त असून, ही कौतुकास्पद बाब आहे.
शालिवाहन राजाचे वंशज
कुंभार समाजाच्या स्थापनेचा इतिहास उपलब्ध नसला तरी तो प्राचीन काळापासून असल्याचे अनेक दाखले मिळतात. याबाबत मिळालेली माहिती अशी : दोन हजार वर्षांपूर्वी पैठणमध्ये कर्णिक सोमदत्त राजाचे, तर उज्जैनमध्ये विक्रमादित्य राजाचे राज्य होते. विक्रमादित्याने सोमदत्ताचा पराभव करून पैठण काबीज केले. त्यावेळी एक ब्राह्मण कुटुंब उदरनिर्वाहासाठी पैठणमध्ये आले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोन मुले आणि गौतमी नावाची मुलगी या भावंडांनी कुंभार कुटुंबात वास्तव्य केले. गौतमीने कुंभाराच्या मुलाशी विवाह केल्यानंतर त्यांना झालेले अपत्य म्हणजे शालिवाहन राजा आणि त्यांचे वंशज म्हणजे कुंभार समाज. विठ्ठलभक्त संत गोरा कुंभार तर अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
कार्यकारिणी अशी
कुंभार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी १९७९ मध्ये कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- जिल्हाध्यक्ष : माजी महापौर मारुतराव कातवरे, उपाध्यक्ष : प्रकाश कुंभार, कार्याध्यक्ष : बबनराव वडणगेकर, सचिव : डी. डी. कुंभार, सदस्य : आर. जी. कुंभार, अशोकराव कुंभार, निवास कुंभार, दिनकर कुंभार, चंद्रकांत कुंभार, अर्जुन सरवडेकर, रावसाहेब कुंभार, आनंदराव कुंभार.
चित्र-शिल्प कलावंतांची पिढी....
पिढीजातच कलाकुसरीची देणगी मिळालेल्या या समाजाने कलानगरी कोल्हापुरात चित्रकार, शिल्पकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. मातीपासून देव आणि सुरेख वस्तू घडविणाऱ्या या समाजातील कलावंतांनी कॅनव्हासवर आपल्या कुंचल्याची जादू रेखाटली. शिल्प निर्माण करत अटकेपार झेंडा लावला. कुंभार मंडप येथे समाजाचे विठ्ठल-रुक्मिणी आणि संत गोरा कुंभार यांचे मंदिर आहे. येथेच गणपतराव वडणगेकर यांनी कलामंदिर कलामहाविद्यालयाची स्थापना केली. मध्यंतरी बंद पडलेले हे महाविद्यालय १९९४ सालापासून पुन्हा सुरू झाले. येथे आजही विद्यार्थ्यांना चित्र-शिल्पकलेचे धडे दिले जातात.