भांडवलशाहीला समाजवाद हाच सक्षम पर्याय : मिश्रा-

By Admin | Updated: December 12, 2014 23:38 IST2014-12-12T23:19:21+5:302014-12-12T23:38:03+5:30

-अवि पानसरे व्याख्यानमाला

Socialism is the only alternative to capitalism: Mishra- | भांडवलशाहीला समाजवाद हाच सक्षम पर्याय : मिश्रा-

भांडवलशाहीला समाजवाद हाच सक्षम पर्याय : मिश्रा-

कोल्हापूर : व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातूनच या देशातील भांडवलशाहीने नवतंत्रज्ञानाचा वापर करीत उत्पादकतेचा विकास केला़ या उत्पादक विकासाच्या जोरावरच ही भांडवलशाही दीर्घकाळ टिकली़ तंत्रज्ञानाने रोजगार कमी केला़; पण तंत्रज्ञानाची मजल रोबोपर्यंत आल्यामुळे तंत्रज्ञान हे अंतिम सीमेवर आले आहे़ अशा परिस्थितीत भांडवलशाहीला समाजवाद हाच सक्षम पर्याय आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सदस्य यु़ एऩ मिश्रा यांनी केले़
श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेचा समारोप आज, शुक्रवारी झाला़ याप्रसंगी ते बोलत होते़ ‘लोकशाही आणि समाजवाद’ हा विषय होता़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे होते़
मिश्रा म्हणाले, लोकशाहीच्या समतेच्या कल्याणकारी ध्येयाकडे जाण्यासाठी समाजवाद ही एक प्रक्रिया आहे़; पण लोकशाही आणि समाजवाद ही वेगवेगळे अंगे आहेत, असा चुकीचा प्रचार काही घटक करीत आहेत़ विकासाच्या नावाखाली लोकशाहीमध्ये विपरीत स्थिती निर्माण झाली आहे़ हे बदलण्यासाठी लोकशाहीवर विश्वास असलेल्या घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे़ इथल्या राजकीय व्यवस्थेच्या मदतीने भांडवलदारांनी प्रचंड नफा मिळविला़ स्वातंत्र्योत्तर काळानंतरही राजकीय व्यवस्था आणि भांडवलदार अशी दोन सरकारे या देशात एकमेकांच्या संगनमताने समांतरपणे चालली आहेत़ त्यामुळे ना कॉँग्रेस स्विस बँकेतील काळा पैसा आणू शकली, ना भाजप़़़ महागाईबाबत नवीन सरकारने हात वर केले आहेत. सर्वांना समान न्याय देणाऱ्या समाजवादी मार्गाने समाजविकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहनही मिश्रा यांनी केले़
कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणाले, राज्यघटनेला समता अभिप्रेत आहे़; पण विषमतेचे तत्त्वज्ञान जोपासणाऱ्यांचे सरकार आता आलेले आहे़ त्यामुळे देशात व राज्यात स्वातंत्र्यानंतर कधीही नसलेली विषमतावादी विचारांची पेरणी करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे़ विषमतावादी तत्त्वज्ञानामुळे घटनेलाच धोका निर्माण झाला आहे़ अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले़

Web Title: Socialism is the only alternative to capitalism: Mishra-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.