उलगडला समाजकार्याचा प्रवास
By Admin | Updated: November 24, 2014 23:58 IST2014-11-24T23:55:03+5:302014-11-24T23:58:11+5:30
'अक्षरगप्पा'त रंगले रसिक : वेगळ्या वाटांवरच्या माणसांचे अनुभव कथन

उलगडला समाजकार्याचा प्रवास
कोल्हापूर : समाजकार्याची पारंपरिक चौकट सोडून जगण्यासाठी, आपत्तीत मदतीला धावून जाणारे, कधी मृतदेह शोधणारे, कधी अंत्यसंस्काराच्या कामात झोकून देणारे, अशा वेगळ््या वाटेवरच्या माणसांनी आपल्या अनुभवांची पोथडी रसिकांसमोर उघडली. ‘व्हाईट आर्मी’चे अशोक रोकडे, जीवरक्षक दिनकर कांबळे आणि दीपक पोलादे यांनी ‘अक्षरगप्पां’मध्ये आपला समाजकार्याचा प्रवास उलगडला.
अक्षर दालन आणि निर्धारच्यावतीने या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक रोडके यांनी बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार कुणी करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आणि व्हाईट आर्मीच्या कामाला सुरुवात झाल्याचे सांगितले. कोकण रेल्वे अपघात, गुजरातचा भूकंप ते आता काश्मीरमध्ये आलेल्या पुरापर्यंतच्या आपत्तीस ‘व्हाईट आर्मी’ने केलेले काम त्यांनी मांडले.
दिनकर कांबळे यांनी आपल्या वहिनीचे प्रेत काढण्यासाठी कुणीच पुढे येईना तेव्हा विहिरीत सूर मारला आणि प्रेत बाहेर काढले तेव्हापासून नदी, नाले, विहीर, तलावात पडलेली प्रेते काढण्याचे काम सुरू झाले. मरण पावलेली व्यक्ती माझ्या कुटुंबातीलच आहे, असे समजून मी हे काम करतो, असे त्यांनी सांगितले.
दीपक पोलादे यांनी पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी बोलण्यापेक्षा कृती म्हणून अॅल्युमिनियमच्या तिरडीपासून रक्षाकुंडापर्यंतचे अनेक उपक्रम राबविले, आता लोक श्रद्धेपोटी एक कलश राख पाण्यात तर उर्वरित राख रक्षाकुंडात टाकण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे पोलादे यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)