समाजकल्याण अधिकारी वेठीस
By Admin | Updated: June 23, 2015 00:00 IST2015-06-23T00:00:54+5:302015-06-23T00:00:54+5:30
वरिष्ठांकडून अरेरावी : खोट्या तक्रारीत गुंतवण्याचा प्रयत्न

समाजकल्याण अधिकारी वेठीस
सांगली : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील एका महिला कर्मचाऱ्यांना हाताशी धरून समाजकल्याण अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेठीस धरले जात आहे. खोट्या तक्रारीवरून नोटीस पाठविण्यासह अनेक उद्योग वरिष्ठांकडून चालू असल्यामुळे ‘ते’ अधिकारी हतबल झाले आहेत.सामाजकल्याण विभागातील आर्थिक घोटाळ्यांना नूतन समाजकल्याण अधिकाऱ्यांनी लगाम घातला आहे. एमपीएससी परीक्षेतून निवड झालेल्या समाजकल्याण अधिकाऱ्यांची पहिलीच नियुक्ती सांगली जिल्हा परिषदेत झाली आहे. यामुळे त्यांनी विभागातील गैरकारभारास लगाम घातला आहे. परंतु, हाच त्यांचा पारदर्शी कारभार वरिष्ठांना अडचणीचा ठरत आहे.म्हणून एका महिला कर्मचाऱ्यांना हाताशी धरून समाजकल्याण अधिकाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्याविरोधात खोटी तक्रार एकाकडून घेऊन त्याद्वारे कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याला अशाप्रकारे नोटीस दिल्यामुळे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तेथे त्यांना अश्रू अनावर झाले होते. या कारभारावरून अन्य खातेप्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी वर्गातील या सुप्त संघर्षाने जिल्हा परिषदेच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)