वार्ता फलकाद्वारे इथं होतंय समाजप्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:44+5:302021-05-24T04:21:44+5:30
कोल्हापूर : शहरातील तालीम संस्था, मंडळांचे वार्ता फलक म्हणजे समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे, सुविचारांद्वारे संस्कार देणारे, जगभरातील बातम्या सांगणारे हक्काचे व्यासपीठच ...

वार्ता फलकाद्वारे इथं होतंय समाजप्रबोधन
कोल्हापूर : शहरातील तालीम संस्था, मंडळांचे वार्ता फलक म्हणजे समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे, सुविचारांद्वारे संस्कार देणारे, जगभरातील बातम्या सांगणारे हक्काचे व्यासपीठच ! स्मार्टफोन आल्यानंतर झालेल्या माहितीच्या विस्फाेटात या वार्ता फलकांनी अजूनही लक्ष वेधून घेतले आहे. मंगळवार पेठेतील श्री तुकाराम तालीम मंडळाचा वार्ता फलक आकर्षक व्यंगचित्रासह केल्या जात असलेल्या प्रबोधनामुळे चर्चेत आला आहे.
मंगळवार पेठेतील शतकोत्तर परंपरा असलेली एक जुनी तालीम असलेल्या श्री तुकाराम माळी तालीम मंडळ यांचा वार्ता फलक साठमारी येथील भैरवनाथ चौक येथे आहे. नुकतेच तीन चार महिन्यापूर्वी वार्ता फलकाचे नूतनीकरण करण्यात आले. गेले अनेक महिने या वार्ता फलकावर अतिशय सुंदर असे सुविचार, चित्रे काढून बोधविचार, प्रेरणादायी विचार तसेच सामाजिक उत्सवाबद्दल, थोरामोठ्यांची जयंतीची माहिती रोज सकाळी न चुकता लिहिली जाते . येणारे-जाणारे नागरिक हे आवडीने वाचत तर असतातच, याबद्दल चर्चाही केली जाते. अनेक जण खास वार्ता फलक वाचण्यासाठी येत असतात.
कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी रविवारी १५ मे पासून आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला. तशा सूचनाही जारी करण्यात आल्या. पण लॉकडाऊनच्या काळात अनेक जण गल्लीबोळात क्रिकेट, फुटबॉल खेळत असतात. अनेक जण भाजी,बाजाराच्या नावाखाली उगाच फिरत असतात. अशा लोकांना आळा बसावा व कडक लॉकडाऊन लोकांनी पाळावा याकरिता वार्ता फलकावर सुंदर चित्रांसहित लोकांनी घरी राहावे याकरिता काही घोषवाक्य फुले तसेच पोलीस व प्रशासन, डॉक्टर, नर्सेस व सफाई कामगार यांची सेवा चित्रे रेखाटण्यात आली होती.
कोरोनाबाबत आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजप्रबोधन होत असल्यामुळे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याच्या आवाहनामुळे या वार्ता फलकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फोटो क्रमांक - २३०५२०२१-कोल-तुकाराम माळी तालीम०१/०२/०३
सूचना - ओळ देत नाही, फक्त फोटोच टाकावा.