आतापर्यंत ३0२ मतदार सहलीवर

By Admin | Updated: December 21, 2015 00:34 IST2015-12-21T00:21:07+5:302015-12-21T00:34:04+5:30

जि. प. सदस्य रवाना : दोन्ही काँग्रेस, ‘जनसुराज्य’चे ४० सदस्य सतेज पाटील यांच्या ताब्यात

So far, 302 voters participated | आतापर्यंत ३0२ मतदार सहलीवर

आतापर्यंत ३0२ मतदार सहलीवर

कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले असून, रविवारी सकाळी काँग्रेसचे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य सहलीवर रवाना झाले. आतापर्यंत एकूण ३०२ मतदार सहलीवर गेले आहेत. त्यामध्ये कॉँग्रेसकडून २२६, तर विरोधी गटाकडून ७६ मतदार सहलीवर पाठविल्याचे सूत्रांकडून समजते. सतेज पाटील यांच्या गटाचे सोडून सुमारे ४० सदस्यही अज्ञातस्थळी पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाचे सदस्यही रवाना झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे ६९ सदस्य व पंचायत समितींचे बारा सभापती असे ८१ मतदार जिल्हा परिषद अंतर्गत येतात. त्यामध्ये काँग्रेस ३०, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, तर जनसुराज्य पक्षाचे ६ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यातील बहुतांशी जवळपास ४० सदस्य सहलीवर पाठविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य, सभापती व नगरपालिकेचे नगरसेवकांना दक्षिण भारतात पाठविण्यात आल्याचे समजते, तर काँग्रेसच्या सदस्यांनाही अज्ञातस्थळी पाठविण्यात आले. मतदारांचा कोणाशीही संपर्क होऊ नये, याची दक्षता काँग्रेसकडून घेतली असून मतदारांना सहलीस कुठे पाठविले आहे, याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
दरम्यान, दोन्हीही गटाचे बहुतेक मतदार शुक्रवारपर्यंत सहलीवर राहणार आहेत. शनिवारी दुपारी मतदारांना कोल्हापूर व बेळगांव येथे आणले जाणार असल्याचे समजते.


सदस्य कव्हरेज क्षेत्राबाहेर
जिल्हा परिषदेच्या सदस्यांना फोन लावला असता, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सहलीवर पाठविलेल्या मतदारांशी कोणाचा संपर्क होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे.


पन्हाळ्यातील नगरसेवकांमधील फूट कायम
पन्हाळा : पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक सहलीला गेले आहेत. त्यातही मोकाशी गटाचे सात नगरसेवक आपला सवतासुभा दाखवत स्वतंत्रपणे सहलीला गेले आहेत. त्यामुळे पन्हाळ्याचे नगरसेवक जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत असले तरी त्यांच्यात असलेली फूट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जनसुराज्यचे पक्षप्रतोद विजयसिंह जाधव यांनी १२ नगरसेवक बंगलोर, म्हैसूर, उटी या दक्षिण भारत सहलीवर नेले आहेत. सर्व नगरसेवकांचे फोन बंद असले तरी बरोबर असणाऱ्या एकाकडून ही माहिती समजली. जाधव यांनी, पन्हाळ्याचे सर्व नगरसेवक एकदिलाने व आम्ही सांगेल तिथे मतदान करणार असल्याचे सांगितले; तर नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी आपली भूमिका वेगळी असल्याचे स्पष्ट केले.


पेठवडगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदारांमध्ये फोडाफोडी होऊ नये म्हणून येथील बहुसंख्य नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. मात्र, नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्यासह आणखी दोन नगरसेवक शहरात आहेत. सहलीवर गेल््यामुळे अनेक नगरसेवकांचे फोन बंद आहेत.
पेठवडगाव पालिकेतील सत्तारूढ यादव गट हा काँग्रेस पुरस्कृत आहे. येथे १३ निवडणूक आलेले व दोन स्वीकृत असे १५ नगरसेवक आहेत. ते सतेज पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचे निश्चित आहे, तर राष्ट्रवादी- युवक क्रांती आघाडीचे चार नगरसेवक आहेत. त्यांनी विधान परिषदेसाठी नेमका कोणाला पाठिंबा द्यायचा आहे, हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे.

Web Title: So far, 302 voters participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.