स्नेहलला मंगळ लागला लकी...
By Admin | Updated: December 7, 2014 00:55 IST2014-12-07T00:47:52+5:302014-12-07T00:55:58+5:30
इस्त्रोमध्ये संशोधक : मंगळयान मोहिमेच्या यशानंतर विवाह बंधनात

स्नेहलला मंगळ लागला लकी...
प्रकाश चोथे / गडहिंग्लज
लग्नाच्या बाजारात मंगळाकडे वाकड्या नजरेने पाहिले जात असले तरी इस्रोच्या माध्यमातून मंगळ यान मोहिमेत मोलाची भूमिका बजावून गडहिंग्लजचे नाव जगभर करणारी इस्त्रोमध्ये संशोधक असलेल्या स्नेहल मोरे हिला मात्र मंगळ लकी ठरला. आई-वडिलांच्या इच्छेनुसार ती उद्या, रविवारी विवाह बंधनात अडकणार आहे.
मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करूनही नवोदय विद्यालयामधून राज्यात दुसरा क्रमांक मिळवित ‘आयआयटी’चे शिवधनुष्य लिलया पेलणाऱ्या अन इस्रोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेतून मंगळयान मोहिमेत खारीचा वाटा उचलणाऱ्या स्नेहलमुळे गडहिंग्लजकरांसह संपूर्ण जिल्ह्याची मान ताठ झाली.
कागल तालुक्यातील बाळेघोल हे तिचे जन्मगाव... या गावातून इस्रो
पर्यंत धडक मारणाऱ्या स्नेहल मोरे हिचा प्रवास प्रेरणादायी आहे. मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत ती गडहिंग्लज येथील शिवाजी विद्यालयात दाखल झाली. ११ व्या वर्षी तिने कागल येथे नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला. सीबीएसईचा पॅटर्न अवगत करतानाच ती फिजिक्स आणि गणितच्या प्रेमात पडली. आयआयटीच्या ट्युुशन देणाऱ्या कोटा (राजस्थान) येथील नामांकित रेजोनंन्स संस्थेत हजारो विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली. आयआयटीसारखा क्लिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करतानाच तिने जागृती कॉलेजमधून १२ वीही पूर्ण केली. आयआयटीतून तिच्या बॅचमधील इस्रोसाठी निवड होणारी जिल्ह्यातील ती एकमेव विद्यार्थिनी आहे. केरळ मधील तिरुअनंतपुरम येथे इंडियन स्पेस रिसर्च आॅगर्नायझेशन
(इस्रो) मध्ये अध्ययन पूर्ण केले.
हैदराबाद येथील द नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी या इस्रोच्या संशोधन केंद्रात काम करताना संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या मंगळ यान मोहिमेत तिचा खारीचा वाटा होता.
प्रसिद्धीपासून दूर...
इस्रो सोबत काम करून मंगळ यान सारख्या नेत्रदीपक यशस्वी मोहिमेनंतरही स्नेहलला प्रसिद्धीचा हव्यास नाही. आहे तो फक्त देशाविषयी प्रचंड अभिमान..! स्वत:ची यशोगाथा न सांगता ती केवळ इस्रोविषयी भरभरून बोलत होती. नवोदितांनी आणि अभ्यासकांनी इस्रोच्या मार्गदर्शक माहितीच्या खजिन्याचा वापर करावा, असे स्नेहलने आवर्जून सांगितले.
द नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी...!
इंडियन स्पेस रिसर्च आॅगर्नायझेशन (इस्रो) च्या अवकाश कार्यक्रमासंबंधी संशोधन व विकासकार्याचे काम विक्रम साराभाई स्पेस सेंटर (तिरुवनंतपुरम), इस्त्रो सॅटेलाइट सेंटर (बंगलोर), शार (रऌअफ) सेंटर (श्रीहरिकोटा बेट) आदींसह देशभरातील विविध १२ केंद्रावरून चालते. त्यापैकीच एक द नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी (हैदराबाद). रिमोट सेन्सिंग एजन्सीच्या माध्यमातून उपग्रहामार्फत शेती, पाणी, जमिनीचा वापर यासह विविध बाबींविषयी माहिती गोळा करणे आणि त्यासंदर्भातील संशोधनाचे काम चालते.
लग्नाचेही वेगळेपण
स्नेहलने लग्नासाठी आपल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतलेल्या शिवाजी विद्यालय, नवोदय विद्यालयाच्या सर्व मुला-मुलींना आवर्जून आमंत्रण दिले आहे. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गडहिंग्लज येथील हॉटेल जनाई पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे. यावेळी उपस्थितांना इंद्रजित देशमुख यांच्या ‘लेक वाचवा’ या विषयावरील व्याख्यानासह स्नेहलच्या ‘इस्रो’ संदर्भातील विविध व्हिडिओज स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहेत.
आई-वडिलांचे साधेपण
गगनभरारी घेणाऱ्या स्नेहलचे वडील सदाशिव मोरे हे गोकुळ दूध संघात संकलन अधिकारी होते, तर आई विद्या या गृहिणी आहेत. स्नेहलचा भाऊ विकास हासुद्धा वडिलांच्याच व्यवसायातील आधुनिक शिक्षण घेत आहे.
स्नेहलची साथीदाराची निवड
स्नेहलने अनेक स्थळांना नाकारत सातारा येथील ग्रामसेवक असणाऱ्या विठ्ठल साबळे यांच्या स्वकर्तृत्वाने मोठा झालेला मुलगा ‘राजेश’ची निवड केली. गुरुकुलमधील शिक्षणानंतर राजेश ‘युएसए’त कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.