तस्कर शिरजोर, अधिकारी कमजोर

By Admin | Updated: April 10, 2015 23:39 IST2015-04-10T21:28:51+5:302015-04-10T23:39:30+5:30

तहसीलदारांपुढे आव्हान : शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद, औरवाडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा

Smugglers, weaker officers | तस्कर शिरजोर, अधिकारी कमजोर

तस्कर शिरजोर, अधिकारी कमजोर

शिरोळ : कोट्यवधी रूपयांची वाळू चोरी करणाऱ्या वाळू तस्करीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कवठेगुलंद, औरवाड, शेडशाळ येथे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्यामुळे याला कोण आळा घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई करण्याचे आव्हान तहसीलदार सचिन गिरी यांच्यासमोर उभे राहिले आहे.
वाळूचे आगर म्हणून शिरोळ तालुक्याला संबोधले जाते. कोथळी, कवठेसार, चिंचवाड, उदगाव, घालवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, बस्तवाड, राजापूर, कुटवाड ही वाळूची मुख्य ठिकाणे असून वाळू लिलावातून १० कोटी रूपयाचे उद्दिष्ट होते. मात्र, महसूल विभागाला १२ कोटी रूपयाचा निधी मिळाला आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळाल्यामुळे शिरोळ महसूल विभागाचे गौणखनिजाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लिलाव झाल्यानंतर कोट्यवधी रूपयाची गुंतवणूक करणाऱ्या काही ठेकेदारांना महसूल विभागाने कब्जापट्टी व वाहतूक पावत्या नसतानाही ग्रीन सिग्नल दिला होता.
मार्चमध्ये १७ बेकायदेशीर वाळू आवटीवर कारवाई करून तहसीलदार गिरी यांनी धडक मोहीम राबविली होती. धाडसी कारवाईमुळे वाळू तस्करांत खळबळ उडाली होती. सध्या औरवाड, कवठेगुलंद व शेडशाळ या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू झाला आहे.
कोट्यवधी रूपयांची वाळू चोरी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे. प्रशासन यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. यामुळे तहसीलदार गिरी यांच्यासमोर बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा उपशाला खतपाणी घालणाऱ्या महसूल विभागातील यंत्रणेवरही तहसीलदारांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. औरवाडमध्ये पाणी उपसा करणाऱ्या मोटारींजवळच वाळू उपसा सुरू असल्यामुळे दूषित पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोट्यवधी रूपयाची वाळूची लूट सुरू असताना महसूल विभागाने गांधारीची भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)

लिलावधारकांची गळचेपी
बेकायदेशीर वाळू उपशामुळे
लिलाव बोलीतून रितसर वाळू
उपसा करणाऱ्या ठेकेदारांची मोठी गळचेपी झाली आहे. शासकीय परवानगीअभावी वाळू उपसा सुरू असल्यामुळे लाखो रूपये गुंतवून अधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांना
तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन
करावा लागत आहे.


प्रांतांच्या भूमिकेकडे लक्ष
सांगली जिल्ह्यात नियमबाह्य वाळू उपसा करणाऱ्यांवर प्रांताधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारून बोटी जप्त केल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद, शेडशाळ व औरवाडमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असताना या विभागाचे प्रांताधिकारी त्यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Smugglers, weaker officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.