पन्हाळ्यातील ३९ ग्रामपंचायतींत सत्तेसाठी धूमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:11+5:302021-01-13T05:01:11+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत निवडणुकांपैकी तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहे तर ५७ प्रभाग बिनविरोध ...

Smoke for power in 39 gram panchayats in Panhala | पन्हाळ्यातील ३९ ग्रामपंचायतींत सत्तेसाठी धूमशान

पन्हाळ्यातील ३९ ग्रामपंचायतींत सत्तेसाठी धूमशान

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत निवडणुकांपैकी तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहे तर ५७ प्रभाग बिनविरोध झाल्याने निवडणुकीच्या रणधमाळीतून सुटले आहेत. त्यामुळे तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रचाराती रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. गटप्रमुख सत्तेसाठी तर उमेदवार जिंकण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर करून प्रचारयंत्रणा राबवत आहे. विविध आमिषांचा वापर करून मतदारांना टार्गेट केले जात आहे. पक्षापेक्षा गटांतर्गत गुंतलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारामुळे संपूर्ण तालुका राजकीय वातावरणाने ढवळून निघत आहे. गावच्या विकासाचा कणा आणि सत्तेचे केंद्रबिदू समजलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळे ती निवडणूक लढविताना गटनेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचीच कसोटी लागलेली असते. राजकारणाच्या बदलत्या संक्रमणामुळे सर्वांचीच गोची होत असल्याने यावेळची निवडणूक व्यक्तिसापेक्ष होण्याची शक्यता चर्चेतून पुढे येत आहे. प्रचारयंत्रणा शेवटच्या टप्प्यात आल्याने प्रचारात चांगला रंग आला आहे. गटाचे कार्यकर्ते, महिला यांच्या माध्यमातली पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन सुरू आहे. नेत्यांचे कार्यकर्ते गटातटांत विभागल्याने कुणालाही दुखवायला नको म्हणून प्रमुख मंडळी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या नीतीचा अवलंब करत आहे. एक गठ्ठा मतदानासाठी उमेदवार नाराज मंडळीच्या संपर्कात राहून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहेत.अंतिम टप्प्यात सर्वच नीतींचा अवलंब राजकर्त्यांकडून होताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मतदारांवर दबाबतंत्राचा वापर केला जातं आहे. सोयीच्या राजकारणासाठी एकत्र येणारे राजकारणी मतलबीपणासाठी टोकाची भूमिका घेत आहेत. गुलाबी नोट, जेवणावळ, यासह अन्य अमिषे दाखवून प्रचार सुरू आहे. पाच दिवस चमत्कार करणारे मंडळी पाच वर्ष सर्वसामान्यांना चकरा मारायला लावतात. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

चौकट

विकासाच्या भूलथापा, गटाचा अजेंडा, केलेल्या कामाची तत्परता या माध्यमातून प्रचारयंत्रणा राबविली जात आहे. प्रत्येक प्रभागात एकतरी धनदांडगा उमेदवार उभा करून बाकीच्या उमेदवारांना ओढून-ताणून आणण्यासाठी बळ देण्याच्या क्लृप्त्या यशस्वी करण्यासाठी राजकारण्यांची धडपड सुरू आहे. विकास सकृतदर्शनी दाखवत प्रतिष्ठेसाठी निवडणुका लढविल्या जात असल्याची चर्चा पारावरच्या कट्ट्यांवर रंगत आहेत.

Web Title: Smoke for power in 39 gram panchayats in Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.