धूर होणार बेलगाम--लोकमत सर्वेक्षण

By Admin | Updated: November 28, 2014 00:06 IST2014-11-27T21:32:09+5:302014-11-28T00:06:25+5:30

व्यसन सिगारेटचे : पाकिटाऐवजी सुटी सिगारेट घेणारेच अधिक

Smoke Belgaum - Lokmat Survey | धूर होणार बेलगाम--लोकमत सर्वेक्षण

धूर होणार बेलगाम--लोकमत सर्वेक्षण

प्रगती जाधव-पाटील - सातारा -देशात सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. या निर्णयामुळे पाकीटच विकत घ्यायची सक्ती केली जाणार आहे. त्यामुळे धुराची मर्यादित वलये आता बेलगाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण सद्य:स्थितीत पाकीट घेऊन सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा सुटी सिगारेट घेऊन ओढणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, असे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
साताऱ्यात तरूणांबरोबरच मध्यमवयीन पुरूषांमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण मोठे आहे. महाविद्यालयीन तरूणांना पाकिट ठेवायचे कोणाकडे हा प्रश्न भेडसावतो. तर वैद्यकीय सल्ला ऐकून एक-एक सिगारेट आणून ओढणे अधिक पसंत करतात.
शालेय आणि महाविद्यालयीन युवांमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण वाढत आहे. चित्रपटातील दृश्यांचा प्रभाव आणि मर्दानी धाडस यामुळे सिगारेटकडे मुलांचा कल असतो. कुटुंबीय आणि समाजापासून लपवून सिगारेट ओढणारी ही पिढी मोठ्या प्रमाणात सुटी सिगारेट ओढण्यास प्राधान्य देतात. साधारण ३० ते ४० या वयोगटातील लोक घरात मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढतात. पण आपलं मुलं थोडं कळतं झालं की त्यांच्या आडून रस्त्यावर किंवा पानटपरीवर सिगारेट ओढून घरात येणाऱ्या पित्यांचे प्रमाणही अलीकडे वाढलेले दिसते. अनेक घरांमध्ये सिगारेट ओढण्यावर ज्येष्ठांच्या मर्यादा आहेत. काहीदा घरात असलेल्या लहानग्या नातवंडांच्या आरोग्याच्या काळजीपोटी ही सवय म्हणून औषधांच्या डोस प्रमाणे सिगारेट ओढले जाते. मात्र, ज्या घरांमध्ये मुलं आणि नातवंडं नोकरीच्या निमित्ताने दूर आहेत, त्या घरात एकटेपणा घालविण्याचे प्रमुख साधन म्हणून सिगारेटचा वापर केला जातो, असे दिसून आले आहे.


चार आण्याची सिगारेट अन्.. बारा आण्याची बडीशेप!
सातारा शहरात काही ठिकाणी शालेय विद्यार्थीही सिगारेट ओढतानाचे चित्र दिसते. शाळा परिसरात असलेल्या स्टेशनरीच्या दुकानांमध्ये सिगारेट उपलब्ध होते. मित्रांच्या ग्रुपच्या आडोशाने ओढण्यात येणाऱ्या सिगारेटचा वास घरातल्यांना येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पाच रूपयांची सिगारेट आणि दहा रूपयांची बडीशेप अशी अवस्था विद्यार्थ्यांची होते.


सुटी सिगारेटच बरी
महाविद्यालयात गेल्यानंतर युवकांना सिगारेट, तंबाखू या गोष्टींचे आकर्षण असते. त्यामुळे अनेकदा मित्र किंवा सिनियरच्या मार्गदर्शनाखाली सिगारेट ओढण्याचा ‘वर्ग’ आडरस्त्यावर सुरू होतो. पहिला झुरका ओढल्यानंतर आलेला अनुभव लक्षात घेता दुसऱ्यांदा झुरका मारायचा का हा विचार असतो. अशा वेळी एखादी सिगारेट जास्त घेऊन तिचा ‘स्टेपनी’सारखा वापर तरूण करतात. वयस्कांनाही वैद्यकीय सल्ल्यानुसार सिगारेट सोडण्याचा सल्ला मिळतो. घरात पाकीट असले की बेलगाम सिगारेट ओढली जाते. त्यामुळे सुटे सिगारेट थोडे महाग पडले तरीही घेण्याकडे अधिक कल असतो.

अशा या गुप्त जागा...
सिगारेट लपवण्याच्या जागाही धम्माल असतात. कोणी टूलबॉक्समध्ये सिगारेट लपवून ठेवतात, तर कोणाला सिक्युरिटी गेटचा आधार मिळतो. कोणी डिसेशन बॉक्समध्ये कव्हरच्या आत सिगारेट ठेवतात तर कोणी गाडीच्या डिकीत असणाऱ्या कपड्यात लपवून ठेवतो. सर्वाधिक धम्माल म्हणजे बूट काढल्यानंतर त्यातही सिगारेट ठेवणारे महाभाग आहेत.

सिगारेटबरोबर पेय सक्तीचे
सातारा शहरात अनेक ठिकाणी ‘नो स्मोकिंग झोन’ आहे. विशेषत: हॉटेल, दवाखाना याठिकाणी या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. याच साताऱ्यात काही हॉटेल व्यावसायिकांनी एक अद्भुत फंडा सुरू केला आहे. सिगारेट ओढायचे असेल तर किमान चहा किंवा थंड पेय सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे या हॉटेलशेजारून जाताना अन्नपदार्थांऐवजी सिगारेटच्या धुराचा वास अधिक येतो.

का हवी सुट्टी सिगारेट
आर्थिकदृष्ट्या तरूणांना सिगारेटचे पाकीट घेणे शक्य होतेच असे नाही. एकाचवेळी सिगारेटमध्ये पूर्ण रक्कम गुंतवणे तरूणाईला पसंत नाही.
तरूणांना सिगारेट पाकीट ठेवायला खूप मर्यादा आहेत.
मजुरी आणि अन्य कष्टाची कामे करणाऱ्यांना सिगारेट ओढण्याची तलफ होते. कामाच्या ठिकाणी ते सिगारेट किंवा बिडी घेतात; पण खिशात पाकीट भिजेल या भीतीने ते पाकीट विकत घेत नाहीत.
सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी किंवा लायटर सोबत बाळगणे अशक्य आहे म्हणून.
महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर पालकांचे बारीक लक्ष असते. काही पालक तर पाल्याची शंका आल्यास सॅक आणि रूमही याच धास्तीने तपासतात. त्यात सापडू नये म्हणून.

Web Title: Smoke Belgaum - Lokmat Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.