निरागस चेहऱ्यावर हास्य खुलत
By Admin | Updated: January 1, 2015 00:26 IST2015-01-01T00:22:34+5:302015-01-01T00:26:01+5:30
एक लिटर दूध आणि समाधानाची साय...

निरागस चेहऱ्यावर हास्य खुलत
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
‘प्रहार’ चित्रपटात नाना पाटेकरचा एक डायलॉग आहे. एक चिमुकला त्याच्याजवळ बसलेला असतो. नानाचे भारदस्त दंड दोन्ही हातांनी दाबून तो कसे म्हणतो, ‘अरे बापरे, तुमच्या दंडांत किती ताकद आहे..!’ त्यावर नानाचे उत्तर असते, ‘ताकद दंडात असून चालत नाही. ती मेंदूत असावी लागते.’ तसेच काहीसे एखाद्याला मदत करण्यातही असते. तुमच्या खिशात किती श्रीमंती आहे, यापेक्षा ती तुमच्या मनात किती आहे, तसेच तुम्ही एखाद्याच्या मदतीला किती धावून जाता, यावर ती ठरते. अशीच मनाची श्रीमंती असलेल्या एका साध्या माणसाची ही गोष्ट आहे, तुमच्या-आमच्या जगण्याला नवी प्रेरणा देणारी... नव्या वर्षात काहीतरी नक्की चांगले करायला लावणारी...
कोल्हापुरातील बालकल्याण संकुलाचा संसार शासनापेक्षा समाजाच्या मदतीवरच आज सुखाने सुरू आहे. आपल्या घासातील एक घास या मुलांच्या पोटात गेला पाहिजे, असे वाटणारा समाज वाढतो आहे. त्यामुळे अनाथ, निराधार व वंचितांचे आयुष्य सुखाचे होत आहे; परंतु या संस्थेला गेल्या तीन वर्षांपासून याच मदतीचे एक अनोखे रूप पाहायला मिळत आहे. घडते ते असे... वेळ सकाळी नऊ-साडेनऊची असते. पांढरीशुभ्र विजार, तसलाच पांढरा सदरा घातलेली साठीच्या आसपासची एक व्यक्ती आपल्या जुन्या सायकलीवरून संकुलात येते. त्यांच्या हातात एक लिटर दुधाची पिशवी असते. ते थेट वात्सल्य बालसदनात जातात. त्यांनी आणलेल्या दुधाच्या पिशवीतील दूध त्या मुलांच्या पोटात जावे, असे त्यांना वाटते. संकुलातील मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य ते पाहतात. त्यात त्यांना जगावेगळे समाधान लाभते व आल्या वाटेने ते निमूटपणे निघून जातात. साधारणत: आठवड्यातून दोन ते तीनवेळा असे घडते. ते कोण आहेत, काय करतात, त्यांच्या पोटा-पाण्याचा व्यवसाय काय, याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कधी बोलते केले तर ते नुसते हसतात. नाव-गाव कशाला हवे, असाच त्यांचा प्रतिप्रश्न असतो. आपण जे करतो त्याबद्दलची कोणतीच सहानुभूती त्यांना नको असते.
ठरवून एखादी चांगली गोष्ट करायचीच म्हटल्यावर हे तुम्हाला-आम्हालाही सहज करता येणे शक्य आहे. दुधाचे सोडा; अन्य कोणत्याही स्वरूपाची मदत अन्य कोणत्याही संस्थेला अथवा गरजवंताला आपण करू शकतो, फक्त तो पाझर तुमच्या मनातून पाझरायला हवा...
‘गोकुळ’ची दानत
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ) बालकल्याण संकुलात रोज पंधरा लिटर दूध मोफत देतो. स्वर्गीय नेते आनंदराव पाटील-चुयेकर यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी दूध सुरू केले तेव्हा मुले कमी होती. आता ती वाढल्याने पंधराऐवजी तीस लिटर दूध पुरवावे, असा प्रस्ताव संस्थेने ‘गोकुळ’कडे कित्येक दिवसांपूर्वी दिला आहे; परंतु ‘गोकुळ’ ही दानत नव्या वर्षात तरी दाखवील का, अशी विचारणा होत आहे.