सखींना मिळाल्या स्मार्टनेसच्या टिप्स
By Admin | Updated: April 8, 2015 23:59 IST2015-04-08T23:43:35+5:302015-04-08T23:59:43+5:30
‘लोकमत सखी मंच’चा कार्यक्रम : तंत्रज्ञान वापरासह खमंग मसाले बनवण्याचे प्रशिक्षण

सखींना मिळाल्या स्मार्टनेसच्या टिप्स
कोल्हापूर : गृहिणींनी स्वत:ला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत दैनंदिन जीवनात संगणकाचा वापर कसा करावा, यासह ‘रोजचे जेवण अधिक चवदार कसे बनवाल,’ या स्मार्टनेसच्या टिप्स बुधवारी ‘लोकमत सखी मंच’च्या सभासदांना मिळाल्या. निमित्त होते सखी मंच आयोजित ‘स्मार्ट सखी’ या कार्यक्रमाचे. शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर सृजन अॅनिमेशन इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक संतोष रासकर, दीपक माने, आदित्य काळाणे, दिशा पाटील, गंधाली दिंडे उपस्थित होत्या.
उद्घाटनानंतर गंधाली दिंडे यांनी महिलांना विविध मसाले बनविण्याचे प्रशिक्षण दिले. यात पावभाजी, सांबार, गरम मसाला, पंजाबी मसाला, रसोई मॅजिक हे विविध मसाले बनवून दाखविले. त्यांना विद्या लोहार यांनी सहकार्य केले.
त्यानंतर संतोष रासकर यांनी दैनंदिन जीवनात संगणकाचा वापर यावर मार्गदर्शन केले. संगणक आणि मोबाईलचा वापर आता अविभाज्य बनला आहे. प्रत्येकाला स्वत:ची गोष्ट सांगण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण नवी उंची गाठू, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी संगणकावर विविध प्रात्यक्षिके सादर केली. सृजन संस्थेच्यावतीने या विषयावर कार्यशाळा होणार असून, इच्छुकांनी राजारामपुरी सातवी गल्ली येथील ‘सृजन’च्या शाखेत नावनोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.
५‘ते दोन दिवस’च्या टीमची भेट
‘ते दोन दिवस’ या चित्रपटाच्या टीमने सखी सदस्यांशी गप्पा मारल्या. यावेळी अभिनेत्री अलका कुबल, प्रसिद्धी आयलवार, संजित धुरी, बालकलाकार चिन्मय देशकर, निर्मात्या रूपाली कोंडेवार, देवेंद्र बेलनकर, सोमेश्वर बालपांडे उपस्थित होते. हा चित्रपट दोन पिढ्यांमधील अंतर आणि आई-वडिलांच्या त्यागाची कथा आहे, अशी माहिती अलका कुबल यांनी दिली. यावेळी लकी ड्रॉ विजेत्या सुवर्णा सुतार, विजयादेवी निपाणकर, अनिता पाटील यांना बक्षीस देण्यात आले.