‘स्मार्ट सिटी’त कोल्हापूरला ठेंगा

By Admin | Updated: August 1, 2015 01:02 IST2015-08-01T01:01:59+5:302015-08-01T01:02:17+5:30

‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रयत्न केले होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेऊन ‘स्मार्ट सिटी’ योजनेतसाठी सहकार्यचे आवाहन केले होते

'Smart City' will hit Kolhapur | ‘स्मार्ट सिटी’त कोल्हापूरला ठेंगा

‘स्मार्ट सिटी’त कोल्हापूरला ठेंगा

कोल्हापूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाला नाही. या योजनेत सहभागासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासनाने चिकाटीने प्रयत्न करूनही यश आले नाही. ‘स्मार्ट सिटी’त ठेंगा दाखवण्यात आल्यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये निराशा पसरली आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेऊन प्रशासनास ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनानेही सादर केलेल्या निकषांची पुनर्पडताळणी करत त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेतली होती. राज्यातील इतर महापालिकेच्या स्पर्धेत कोल्हापूर शहर कमी पडले. १०० गुणांपैकी तुलनेत कमी गुण पडल्यानेच शहराचा योजनेत समावेश होऊ शकला नाही.
‘स्मार्ट सिटी’ योजनेतील या शहरांची निवड मुबलक पाणीपुरवठा, अखंड
विद्युत पुरवठा, आदी १५ निकषांदारे गुणपद्धतीने वर्गीकरण करून निवड केली आहे. (प्रतिनिधी)


सीसी टीव्ही, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, वायफाय योजना, आदी प्रस्तावित योजनांचा मात्रा लागू झाली नाही. परिणामी शहर स्मार्ट सिटी योजनेपासून लांब राहिल्याची चर्चा आहे.
सार्वजनिक वीजपुरवठा, नदी प्रदूषण, पार्किंग व्यवस्थेसाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था, गरिबांसाठी घरे योजना, पारदर्शक प्रशासन या मुद्द्यावर महापालिका प्रशासन कमी पडले.

स्मार्ट सिटी योजनेत कसोशीने प्रयत्न करूनही शहरास स्थान मिळाले नाही याचे दु:ख आहे. सोलापूर वगळता कोणत्याही लहान शहराचा यामध्ये समावेश झालेला नाही. केंद्र व राज्य शासनाच्या इतर अनेक योजनांतून शहरासाठी निधी आणून विकासाचे काम यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील. स्मार्ट योजनेत सहभाग नसला तरी यातील चांगल्या योजनांचे कामकाज यापुढेही सुरू राहील.
- पी. शिवशंकर, आयुक्त, कोल्हापूर महापालिका

‘स्मार्ट सिटी’मधून कोल्हापूरला
जाणून-बुजून राज्य सरकारने वगळले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासावर परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातत्याने पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करत असून ते पुरते विदर्भवादी आहेत.
- हसन मुश्रीफ, आमदार

Web Title: 'Smart City' will hit Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.