अकरावी प्रवेशासाठी झुंबड
By Admin | Updated: July 3, 2016 00:42 IST2016-07-03T00:42:39+5:302016-07-03T00:42:39+5:30
७०५ प्रवेश निश्चित : ११ जुलैपासून होणार नियमित वर्गांना प्रारंभ

अकरावी प्रवेशासाठी झुंबड
कोल्हापूर : शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत यंदाही अकरावी प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियांद्वारे राबविण्यात आले. शुक्रवारी (दि. १) या प्रक्रियेची महाविद्यालयनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली; तर शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याने महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी उसळली. आज विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत ७०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.
अकरावीचे नियमित वर्ग अकरा जुलैपासून सुरू होणार आहेत. ज्यांचे प्रवेश झाले, ते एकदम खुशीत होते. ज्यांचा टक्का कमी आहे, ते अजूनही वशिल्यासाठी राजकीय नेत्यांपासून अनेकांचे उंबरठे झिजवत आहेत. अकरावी प्रवेश केंद्रीय प्रक्रियेंतर्गत शहरातील ३२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १३ हजार २७४ प्रवेश निश्चित करण्यात आले असून, यामध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांचा समावेश आहे. एकूण १४ हजार ३६० प्रवेश अर्ज आले होते. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी ७ जुलैपर्यंत महाविद्यालयांत प्रवेश घ्यावयाचा आहे; तर ८ ते ९ जुलै या कालावधीत इयत्ता दहावी ‘एटीकेटी’ धारक विद्यार्थ्यांचा प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरून उपलब्ध जागांनुसार देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
शनिवारपासून अकरावी प्रवेशनिश्चितीची प्रक्रिया सुरू झाल्याने महाविद्यालयांचा परिसर सकाळी अकरा वाजल्यापासूनच पालकांनी व विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. प्रवेश प्रक्रियेंतर्गत रविवारी न्यू कॉलेज सुरु राहणार आहे.
या ठिकाणी तक्रार निवारण
४प्रवेश यादीबाबत तक्रार असल्यास दि. ४, ५ आणि ७ जुलै रोजी तक्रार निवारण केंद्रे सुरू राहणार आहेत. विज्ञान शाखेसाठी विवेकानंद महाविद्यालय, कॉमर्स शाखेसाठी कॉमर्स कॉलेज, तर कला शाखेसाठी कमला कॉलेज येथे तक्रार निवारण केंद्र सुरू राहणार आहे.
४सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत त्या-त्या शाखेच्या निवारण
केंद्रांवर तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. निवड यादी ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व आरक्षणानुसार केलेली आहे, ही बाब विचारात घेता, हवे असलेले कॉलेज मिळाले नाही, शाखा बदलून पाहिजे, अशा तक्रारींचा विचार केला जाणार नाही.