विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास घोषवाक्यांची ‘क्रेझ’
By Admin | Updated: September 16, 2014 00:08 IST2014-09-16T00:07:33+5:302014-09-16T00:08:21+5:30
तरुणाईचा कानोसा : अपडेट अन् लाईकचा लेखाजोखा; नेत्यांचीही सोशलगिरी

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास घोषवाक्यांची ‘क्रेझ’
संतोष पाटील- कोल्हापूर -यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास अत्यंत कमी वेळ मिळणार आहे. आचारसंहिता सुरू झाल्यापासूनच इच्छुकांनी अल्पखर्चात मतदारांपर्यंत पोहोचविणाऱ्या सोशल मीडियाचा जोरात वापर सुरू केला आहे. सर्वच प्रमुख उमेदवारांनी नावापेक्षा घोषवाक्याला प्राधान्य दिले आहे. ‘तुम्ही माझ्या बरोबर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘हक्काचा माणूस’, ‘साधा माणूस’, अशी बिरुदावली असलेली घोषवाक्ये सोशल मीडियात फिरत आहेत. अनेकांनी सोशल मीडिया सेलची निर्मिती केली, जुने फोटो व प्रचाराच्या अपडेटला मिळणाऱ्या हिटस् व लाईकचा लेखाजोखा मांडला जातोय. निवडणूक ज्वर वाढेल, तशी नेत्यांची सोशलगिरीही वाढणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपणच विकास करण्यासाठी कसे योग्य उमेदवार आहोत. नेत्यांसह कार्यकर्त्यांची फेसबुक, वॉटस् अॅपसारखी माध्यमे सुसाट वेगाने धावत आहेत. यावर प्रशासन मात्र बारकाईने लक्ष ठेवून आहे.
निवडणुकीच्या काळात इतरवेळी दुर्मीळ असलेल्या नेत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून का असेना, जनतेला नित्यनियमाने दर्शन घडते. कमी कालावधीत फुकटच्या प्रचारासाठी कॉम्प्युटर ज्ञानात कच्चे असणाऱ्यांनी खास लोकांना पाचारण केले आहे. सोशल मीडियावरून येणाऱ्या सूचना व समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. आंदोलने, मोर्चा, विकासकामे, आवाहन, शुभेच्छा, सोडविलेल्या समस्या, आदींबरोबरच माहिती देण्याबरोबरच कार्यकर्ते जमविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत.
एक गठ्ठा ‘एसएमएस’वर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. निवडणूक आचारसंहिता व समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले जाऊ नयेत, तसेच अशा प्रकारचा कोणी आगाऊपणा केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी स्वतंत्र ‘सोशल मीडिया सेल’ स्थापन केला आहे. समाजस्वास्थ्य बिघडविणारे किंवा एखाद्याचे जाणीवपूर्वक चारित्रहनन करणाऱ्या मेसेजबाबत माहिती मिळाल्यास निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा. - राजाराम माने, जिल्हाधिकारी