विमानतळावर ‘पानसरे अमर रहे’चा नारा
By Admin | Updated: February 22, 2015 01:07 IST2015-02-22T00:49:15+5:302015-02-22T01:07:40+5:30
कार्यकर्त्यांची गर्दी; आप्तस्वकीयांचा आक्रोश

विमानतळावर ‘पानसरे अमर रहे’चा नारा
कोल्हापूर : उजळाईवाडी विमानतळावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण केले. आप्तस्वकीयांचा आक्रोश अन् कार्यकर्त्यांच्या ‘लाल सलाम... लाल सलाम... पानसरे अमर रहे’च्या घोषणांमुळे विमानतळ परिसर धीरगंभीर बनला.
कॉम्रेड पानसरे यांचे पार्थिव घेऊन मुंबईहून आलेले विशेष विमान दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी उजळाईवाडी विमानतळावर उतरले. पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे, मुलगी स्मिता सातपुते, जावई बन्सी सातपुते, सतीशचंद्र कांबळे, आदी पानसरेंच्या पार्थिवासोबत आले. पानसरे यांचे पार्थिव विमानतळावर आल्यानंतर लाल शर्ट व हातात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लाल झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. ‘पानसरें का अधुरा काम कौन करेगा... कौन करेगा... हम करेंगे, हम करेंगे... हम करेंगे,’ ‘गोविंद पानसरे अमर रहे’च्या जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांचा आवेश पाहून पोलीस दलातही काही काळ स्तब्धता पसरली. मात्र, कार्यकर्त्यांनी संयमाने घेत पानसरे यांना ‘लाल सलाम’ केला.
यावेळी पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हाधिकारी राजाराम माने, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, ‘भाकप’च्या राष्ट्रीय मंडळाचे सचिव शमिन फैजी, राज्य सचिव भालचंद्र कांगो, डॉ. मंजुश्री पवार, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)