कागलमधील सत्तेसाठी ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा

By Admin | Updated: July 6, 2015 00:28 IST2015-07-05T23:46:17+5:302015-07-06T00:28:44+5:30

लाला बावटा ग्रामपंचायती लढवणार : तालुक्यातील ५३ गावांत किमान १५ जागा जिंंकण्याची तयारी

The slogan "Inquilab Zindabad" for power in Kagal | कागलमधील सत्तेसाठी ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा

कागलमधील सत्तेसाठी ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा

दत्तात्रय पाटील - म्हाकवे -कागल तालुक्यात लाल बावटा कामगार संघटनेनेही आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये किमान १० ते १५ सदस्यांची वर्णी लावून संघटनेचे खाते उघडण्याची तयारी केली आहे. त्यादृष्टीने बैठका सुरू आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच काही ग्रामपंचायतींमध्ये लाल निशाण आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा घुमणार आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतींतील सत्ताधाऱ्यांसह प्रबळ दावेदार गटांनाही लाल निशाण संघटनेला गृहीत धरणे चालणार नाही. काही गावांत या संघटनेतील प्रतिनिधी थेट सत्तेत घेण्यासंबंधी स्थानिक नेतेमंडळींकडून विचारणा होत आहे.
जगण्याच्या लढाईत शोषित, दीन-दुबळ्यांसाठी टेकू देणारी आणि जनसामान्यांच्या हितासाठी नेहमीच रस्त्यावर उतरणाऱ्या डाव्या चळवळीचे फार मोठे योगदान आहे. तसेच ऊसदराचा प्रश्न, टोलमुक्ती आंंदोलन यासह अपुरा रेशन पुरवठा, आदी सामाजिक प्रश्नांवर बंड करण्यात डावी आघाडी पुढे असते. मात्र, न्याय मिळेपर्यंत या आघाडीला लाल सलाम केला जातो, अन्यथा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या केलेल्या कामाचा आणि जनमताचा प्रभाव दिसत नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
मात्र, गेल्या पाच वर्षांपासून लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने इमारत व इतर क्षेत्रातील कामगारांची मोट बांधून कागल तालुक्यातील प्रत्येक गावात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तालुक्यात चार हजारांहून अधिक कामगारांची शासन दरबारी नोंदी असून, ते संघटित झाले आहेत. विशेष बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा चेहरा पुढे न करता सर्व संघटना एका झेंड्याखाली आली आहे. कागलमध्ये आजपर्यंत कोणत्याही पक्षाला फारसे महत्त्व नव्हते. येथील गटनेता ज्या पक्षात असेल, त्याच पक्षाचे अस्तित्व येथे असते.
दरम्यान, हळदी, भडगाव, साके, बानगे, सिद्धनेर्ली, लिंगनूर (कापशी), आदी गावांत सर्वच जागा लढविण्याचे संकेत असून, उर्वरित गावांत जास्तीत जास्त जागा लढविण्यात येणार आहेत.

तालुक्यातील कोणत्याही नेत्याला शह देण्यासाठी आम्ही निवडणुका लढविणार नाही, तर लाल बावटा संघटना मजबूत करणे आणि सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावर अंकुश ठेवून शासनाच्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. गेल्या पाच-सात वर्षांतील आमचे प्रगतिपुस्तक पाहिले, तर आम्हाला या निवडणुकीतील यशाची खात्री यायला हरकत नाही. - कॉ. शिवाजीराव मगदूम, जिल्हा संघटक, लाल बावटा

Web Title: The slogan "Inquilab Zindabad" for power in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.